कर्जत : बातमीदार – वीज वितरण कंपनीचे माथेरान येथील कार्यालय अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेले आहे, त्यामुळे येथे कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना पाण्यामध्ये राहूनच जनतेच्या समस्या सोडवाव्या लागत आहेत.
माथेरानमधील राजाराम साळुंखे रोड व पंचवटी नगरच्या बाजूला वीज वितरण कंपनीचे कार्यालय व कर्मचार्यांचे निवासस्थान आहे. नागरिकांची वीज बिल देयके याच कार्यालयात घेतली जातात. या कार्यालयाच्या छपरावरील पत्र्यांची जाळी झाल्याने पावसाचे पाणी कार्यालयात साचत आहे. त्याबाबत येथील अभियंता मंदार चव्हाण यांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रारही केली आहे, मात्र अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष करून कर्मचार्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. अधिकार्यांच्या अनास्थेचा फटका कर्मचार्यांना बसत आहे.
याबाबत येथील सहाय्यक अभियंता मंदार चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही पत्रे बदलण्यासाठी व डागडुजी करिता वरिष्ठांना पत्र दिले आहे. मात्र अजून तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आम्ही छपरावर ताडपत्री टाकून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या येथे नऊ कर्मचारी कार्यरत असून रात्रपाळी करण्यासाठी या ठिकाणी राहावे लागते. पण छापरामधून पाण्याच्या धारा सुरू असल्यामुळे कर्मचारी येथे राहण्यास तयार नाहीत. जर रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा खंडित झाला. तर माथेरानमधील नागरिकांना अंधारात राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.