कर्जत : रामप्रहर वृत्त – मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जतजवळ मालगाडीचे डबे घसरल्याची घटना सोमवारी (दि. 1) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी काही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या, तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
कर्जत ते लोणावळादरम्यान असलेल्या जामरुंग व ठाकूरवाडी रेल्वेस्थानकांच्या मध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे मुंबईहून पुण्याला जाणार्या इंद्रायणी एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, पनवेल-पुणे पॅसेंजर, पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस या पुण्याहून सुटणार्या ट्रेन्स, तसेच कोल्हापूर-कोयना एक्स्प्रेसही मुंबई ते पुणेदरम्यान रद्द करण्यात आली. याशिवाय भुसावळ-पुणे एक्स्प्रेसची यात्रा नाशिक रोड स्थानकात संपवण्यात आली, तर लांब पल्ल्याच्या मुंबईहून पुणेमार्गे जाणार्या गाड्या या इगतपुरीमार्गे वळविण्यात आल्या.