257 पुरस्कारांची खैरात वाटणार्या जिल्हा परिषदेचा प्रताप
कर्जत : बातमीदार
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तब्बल 257 व्यक्तींना ‘रायगड भूषण‘ ने सन्मानित करणार्या रायगड जिल्हा परिषदेवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातील व्यक्तीला रायगड भूषण पुरस्कार देण्याचा पराक्रम रायगड जिल्हा परिषदेने केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र राजिपच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
रायगड जिल्ह्याच्या जडणघडणीत मोठे योगदान असलेल्या ठराविक व्यक्तींना जिल्हा परिषदेकडून रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मात्र यावर्षी (दि. 6 मार्च) तब्बल 257 व्यक्तींना ‘रायगड भूषण‘ ने सन्मानित करण्यात आले. रायगड भूषणची ही खैरात पाहून सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमे यांनी रायगड जिल्हा परिषदेवर जोरदार टीका केली होती. त्यातच ठाणे जिल्ह्यातील नामदेव बैकर यांना रायगड भूषण पुरस्कार देऊन रायगड जिल्हा परिषदेने गोंधळ उडवून दिला आहे.
नामदेव बैकर हे वांगणी जवळील ढवळेपाडा (ता. अंबरनाथ, जि. ठाणे) येथील मूळ रहिवासी असून सध्या त्यांचे वास्तव्य बदलापूर नगर परिषद हद्दीमधील खरवई येथे आहे. ते ज्ञानकमळ शिक्षण संस्था (वांगणी, जि. ठाणे) या संस्थेचे सचिव आहेत. त्यांना ‘रायगड भूषण‘ जाहीर करताना पुरस्कार गठन समितीने त्यांच्या पत्त्याबद्दल काही आक्षेप घेतला नाही काय? या पुरस्कारासाठी स्टॅम्प पेपरवर सत्यप्रतिज्ञापत्र द्यायचे असते, त्यात नामदेव बैकर कोणत्या जिल्ह्यातील आहेत? याची खात्री रायगड जि.प. पुरस्कार समितीने केली नाही काय?, बैकर हे शिक्षण संस्था चालक असून शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना रायगड जिल्ह्यातील व्यक्तीसाठी दिला जाणारा रायगड भूषण पुरस्कार देण्यात आला आहे काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.