रोहे ः प्रतिनिधी
शहरासह ग्रामीण भागाला गेल्या चार दिवसात पावासाने झोडपून काढले असून, सोमवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने कुंडलिका नदीला पुर आला असून, तालुक्यात ठिकठिकाणी झाडे उन्माळुन पडली आहेत. तर रोहा -मुरूड मार्गावर कवळटे गावच्या हद्दीत व पालेखुर्द गावाच्या पश्चिम भागात दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या काळात नेहमीप्रमाणे विजेचा खेळखंडोबा सुरु होता. ग्रामीण भागात काही ठिकाणी काही वेळाकरीता विज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
रोहा तालुक्यात सोमवारी (दि. 1) मुसळधार पाऊस झाला.सकाळी पावसाने सुरूवात केली, सायंकाळी जोर वाढला. तर रात्रभर पावसाने थैमानच घातले होते. या पावासामुळे तालुुक्यातील रोहा केळघर मार्गे मुरूड तसेच रोहा – तांबडी मार्गावर ठिक ठिकाणी झाडे उन्मळुन पडली आहेत. रोहा – केळघर मार्गावर रस्त्याच्या बाजुची दरड मध्यरात्री कोसळल्याने हा मार्ग पुर्णपणे बंद होता.रस्त्यावर प्रचंड प्रमाणात माती आली होती. त्यामुळे रोहा केळघर मार्गे मुरूड हा मार्ग तब्बल आठ तास बंद होता. सकाळी 7 वाजता बांधकाम खात्याच्या वतीने जेसीपी व कामगारांच्या सहाय्याने माती काढण्याचे काम चालु केले. 11 वाजेपर्यंत माती काढण्याचे काम सुरु होते. याच मार्गावर मोठमोठी झाडे कोसळली होती. ही झाडे दूर करण्याचे काम कामगार करीत होते. याच मार्गावर एका ठिकाणी रस्त्याच्या बाजुची माती वाहून गेल्याने साईडपट्टी खचली आहे. रोहा – कोलाड मार्गावरील पालेखुर्द गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या डोंगर भागातून रात्री 10.30वाजण्याच्या सुमारास दरड कोसळी. या ठिकाणी असलेली घरे व गोठया लगत माती आल्याने ग्रामस्थांत भिती निर्माण झाली होती. येथील काही ग्रामस्थांना सुरक्षीत ठिकाणी हलवल्याचे सामाजिक कार्यकर्ते महेश ठाकूर यांनी सांगितले. या गावालगत धोकादायक दरड असून, ती कधीही कोसळू शकते, असेही त्यांनी सांगितले.
रोहा शहर व भुवनेश्वरमधील नाले भरून वाहू लागले होते. तर काही ठिकाणी नाल्याबाहेर पाणी आले होते. शहरात काही ठिकाणी गटारे भरून रस्त्यावर पाणी आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोहे कार्यालया परिसरात मोठया प्रमाणात पाणी होते. रोहा -कोलाड मार्गावरील नवरत्न हॉटेलसमोर पाणी जमा झाले होते. रोहा शहरालगत असलेल्या भुवनेश्वरमधील आदर्श नगर, एकता नगर व वैभव नगर व त्या लगतच्या भागात पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. डोंगरमाथ्यावरून आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे कुंडलिका नदी दुथडी भरून वाहु लागली होती. सायंकाळनंतर पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून आले. कुंडलिका व गंगानदीला पूर आला होता. तालुक्यातील मेढा, धाटाव, खांब, कोलाड, पिंगळसई, चणेरा, यशवंतखार, घोसाळे, विरझोली या परिसरात पावसाने अक्षरश: थैमान घातले होते. डोेंगर माथ्यावरून नाले व ओढे भरून वाहत असल्याचे दिसत होते.