मुरूड : प्रतिनिधी
येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या तीन वर्षांपासून कायम स्वरुपी वैद्यकीय अधीक्षक नियुक्त न केल्यामुळे रुग्णसेवेत अनियमिता दिसून येत आहे. मुरूड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांची तातडीने नियुक्ती करून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
मुरूड ग्रामीण रुग्णालयात सध्या डॉ. विजय हाडबे हे एकमेव वैद्यकिय अधिकारी नियुक्त असून डॉ. दिव्या सोनम व डॉ. शिवानी यांचा 11 महिन्यांचा करार संपुष्टात आल्यामुळे त्यांना सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. डॉ. शिवानी या 30 डिसेंबर 2021 तर डॉ. सोनम यांचा कार्यकाळ 15 जानेवारी 2022 रोजी संपुष्टात आला आहे.
या ग्रामीण रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर्स कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येतात. मात्र पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक कायम स्वरूपी नियुक्त न केल्याने अलिबाग जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पडोळे यांच्याकडे मुरूड ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. डॉ. बागुल यांच्या निवृत्तीनंतर गेल्या तीन वर्षांपासून मुरूड ग्रामीण रुग्णालयात एमडी किंवा एमएस अधिकार्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
कोविडच्या पार्श्वभूमीवर 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सध्या सुरू असून ज्येष्ठ नागरिकांसाठी बुस्टर डोस मोहीम कार्यान्वित करण्यात आली आहे. या ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज सरासरी 100 ते 120 रुग्णांची तपासणी व औषध योजना होत असते. लसीकरण व बाह्यरुग्ण (ओपीडी)विभाग सांभाळतांना सध्या डॉ. विजय हाडबे यांची कसरत सुरु आहे.
तज्ज्ञ डॉक्टर्स नसल्याने येथील रुग्णांना अलिबाग, रोहा अथवा पुणे, मुंबईत वैद्यकीय उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे. गोरगरीबांना हा खर्च परवडत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.दोन डॉक्टर्सचा कंत्राट कालावधी संपुष्टात आल्याने नविन नियुक्ती केली जावी. तसेच रुग्णालयात निष्णात सर्जन, भूलतज्ज्ञदेखील 24 तास उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
दरम्यान, अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची संख्या पुरेशी असल्यास प्रतिनियुक्तीवर दोन-दोन डॉक्टर्स रोटेशन पद्धतीने मुरूड ग्रामीण रुग्णालयात पाठविले तरी लसीकरण कामास वेग येईल. या शिवाय बाह्यरुग्ण विभागात येणार्या रुग्णांना दिलासा मिळेल, असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी वैद्यकिय अधीक्षक डॉ. पाडोळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
लसीकरण व बाह्य रुग्ण विभाग या दोन्ही जबाबदार्या सांभाळतांना कसरत करावी लागते. रिक्त जागांविषयी तसेच कर्मचारी उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
-डॉ. विजय हाडबे, वैद्यकिय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय-मुरूड