Breaking News

नेरळमधील रस्ते गेले पाण्याखाली

कर्जत : बातमीदार

नेरळ रेल्वे स्टेशन लगत असलेल्या निर्माण नगरी भागात असलेले रस्ते पावसात पाण्याखाली गेले आहेत. यावर्षी पाडा भागातून स्टेशनकडे वाहणारे पाणी रेल्वेने नवीन मोरी खोदून निर्माण नगरी भागात सोडले आहे. त्यामुळे निर्माण नगरी भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून, नेरळ ग्रामपंचायतीने तात्पुरती सोय म्हणून नाला तयार करून पाणी वळविले आहे. मात्र ते पाणी पुढील भागात रस्ते व्यापून टाकत आहे.

 नेरळ पाडा भागातील नाल्याचे पाणी पूर्वी रेल्वे स्टेशन परिसरात भरून राहत होते. त्यामुळे जास्त पाऊस असेल तर नेरळ रेल्वे स्थानक पाण्याने भरलेले असायचे. काही दिवसांपुर्वी मध्य रेल्वेने नेरळ स्थानकात येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नवीन मोरी तयार केली. या नवीन मोरीमुळे निर्माण नगरी भाग पाण्याखाली आला आहे. या भागातील नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीने जेसीबी मशीनच्या सहाय्याने पावसाचे पाणी रस्त्यातून बाजूला करण्यासाठी मार्ग काढला आहे.

उपसरपंच अंकुश शेळके आणि माजी सदस्य जयवंत साळुंखे यांनी तेथे काही तास उभे राहून पाणी जाण्याचा मार्ग काढून रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता काही प्रमाणात मोकळा केला. मात्र आजही त्या रस्त्याने चालताना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. दुसरीकडे ते पाणी अस्ताव्यस्त पसरले असून निर्माण नगरी भागातील अनेक इमारतींच्या दारात पावसाचे पाणी आहे. 

– रेल्वे प्रशासनाने नेरळ-कळंब रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यापर्यन्त सिमेंटचा नाला बांधून द्यावा आणि पावसाचे पाणी थेट या नाल्यात सोडावे. रेल्वेने स्वतः हे काम केले नाही, तर त्यांनी 300 मीटर लांबीच्या मोठ्या गटारासाठी निधी द्यावा, अशी ग्रामपंचायतीची मागणी कायम राहणार आहे.

-अंकुश शेळके, उपसरपंच, नेरळ

———————————————– ———————————————————

कर्जत-चौक रस्त्यावर झाड कोसळले

 संततधार पावसामुळे कर्जत-चौक रस्त्यावर मंगळवारी (दि. 2) सकाळी एक मोठे झाड कोसळले. त्यामुळे या मार्गाावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

चौक-कर्जत रस्त्यावर कर्जत पासून धनगरवाडा पर्यन्त रस्ता अरुंद असून त्या भागात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडे देखील आहे. त्यातील अनेक झाडे ही जुनी आणि मोठ्या उंचीची आहेत. त्यातील माणेक बाग येथे असलेले मोठे झाड मंगळवारी सकाळी रस्त्यावर कोसळले. साधारण 9च्या सुमारास कोसळलेल्या या झाडामुळे रस्त्याचा काही भाग दिसेनासा झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने कर्जत येथून जेसीबी मशीन पाठवल्याने तात्काळ रस्ता मोकळा झाला.

– डिकसळ गावातील घराचे नुकसान सोमवारी रात्री वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने डिकसळ (ता. कर्जत) येथील कान्हु बाबाजी साळोखे यांच्या कौलारू घराचे छप्पर उडून गेले. त्यामुळे घरातील सर्व साहित्य पावसाच्या पाण्यात भिजून गेले असून, हे कुटुंब उघड्यावर आले आहे. या नुकसानीचा पंचनामा चिंचवली तलाठी मनीषा धोत्रे यांनी केला आहे. दरम्यान, साळोखे यांना मदत करण्यासाठी डिकसळ ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply