महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील कोथेरी या धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गाव वाड्यांसाठी जोडणार्या रस्त्याला बुधवारी (दि. 3) भगदाड पडले असुन, अतिवृष्टीत हा संपुर्ण रस्ताच वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी महाड तहसिलदारांनी पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत. गेल्या आठ दिवसापासून कोसळणार्या मुसळधार पावसाने महाड शहरासह तालुक्याला झोडपून काढले आहे. या आठ दिवसात महाड तालुक्यात 567.5 मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे बुधवारी सकाळी कोथेरी या धरण क्षेत्रातून जाणार्या रस्त्यावर मोठे भगदाड पडले आहे. पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या खोदकामुळे तसेच मोरीचे तोंड बंद झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले होते. या पाण्याच्या दबावामुळेच हे भगदाड पडले असल्याचा प्राथमीक अंदाज आहे. कोथेरी परिसरातील शिंदेवाडी, मोरेवाडी, वडाचीवाडी या वाड्यांना जोडणारा हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतो. महाडचे नायब तहसिलदार प्रदिप कुडळ यांनी घटनास्थळी जावून पहाणी केली आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाला सूचना दिल्या. त्यानुसार सध्या या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून हे भगदाड बुजविण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र पावसाचा जोर वाढल्यास हा संपुर्ण रस्ता वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.