Wednesday , February 8 2023
Breaking News

आम्ही सरकारसोबत : कोहली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, अशी मागणी होत आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर यांनी याबाबत आपली मते मांडल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानेही मौन सोडले आहे. ‘पाकिस्तानसोबत खेळण्याबाबत केंद्र सरकार जो निर्णय घेईल तो मान्य असेल,’ असे विराटने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने भूमिका स्पष्ट केली. पुलवामातील दहशतवादी हल्ला अतिशय दुःखद आहे, असे तो म्हणाला. हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती त्याने संवेदना व्यक्त केल्या. ‘पाकिस्तानसोबत खेळण्याचा निर्णय हा बीसीसीआय आणि केंद्र सरकार घेतील. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,’ असे तो म्हणाला.

विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी सामना होणार आहे. पाकिस्तानसोबत न खेळण्याची भूमिका काही माजी क्रिकेटपटूंनी मांडली होती; तर सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांनी पाकिस्तानला आयते गुण बहाल करण्यापेक्षा सामन्यात पराभूत करावे, अशी भूमिका मांडली आहे.

…तर वर्ल्ड कपमध्ये भारत खेळणार नाही -शास्त्री

पुलवामा अतिरेकी हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर, सर्वच स्तरांतून भारताने पाकिस्तानाशी क्रिकेट सामना खेळू नये, अशी मागणी होत आहे. अनेक आजी-माजी खेळाडूंनी या प्रकरणावर आपापली मते मांडली आहेत. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी, विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी बीसीसीआय आणि सरकारचा असेल, त्यांनी न खेळण्याचा निर्णय घेतला; तर भारतीय संघ विश्वचषकात खेळणार नाही, असे सांगितले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात खेळायचे की नाही हा निर्णय सर्वस्वी बीसीसीआय आणि सरकारने घ्यायचा आहे. सरकार आणि बीसीसीआय जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला तरीही आम्हाला तो मान्य असेल, असे शास्त्रींनी स्पष्ट केले.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply