नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंडेलाने विश्वविक्रमी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 10 मी. एअर रायफल प्रकारात अपूर्वीने भारताला विश्वचषक स्पर्धेत पदकाची कमाई करून देत धडाकेबाज सुरुवात करून दिली आहे.
या स्पर्धेत भारताच्या अंजुम मुद्गील आणि एल्वेनिल वेल्वेरियन या खेळाडूही उतरल्या होत्या, मात्र पात्रता फेरीचा अडथळा दूर करीत अपूर्वीने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. पात्रता फेरीत अपूर्वीने 629.3 गुणांची कमाई करून चौथे स्थान पटकावले. अंतिम फेरीत अपूर्वीची सुरुवात चांगली झाली नव्हती, मात्र वेळेतच तिने स्वतःला सावरत पुनरागमन केले. दुसर्या आणि तिसर्या प्रयत्नात अपूर्वीने आपल्या कामगिरीत अधिक सुधारणा करीत सर्वोत्तम स्थान गाठले.
अखेर अपूर्वीने आपल्या कामगिरीत सातत्य कायम राखत चिनी खेळाडूंची झुंज मोडीत काढून सुवर्णपदकाची कमाई केली. चीनच्या रुओझू झाओने रौप्य; तर हाँग झूने कांस्यपदकाची कमाई केली.