पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 6) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले.
मुंबई-गोवा महामार्गावरील बांधनवाडी येथील हॉटेल मोतीमहल येथे झालेल्या या समारंभास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे, पेण तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रवक्ते मिलिंद पाटील, सरचिटणीस अविनाश कोळी, चिटणीस शरद कदम, पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, विनोद साबळे, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने कटिबद्ध असल्याचे सांगितले, तसेच त्यांनी भाजप नेते महेश बालदी यांच्याही कार्याचा गौरव केला. या समारंभात मान्यवरांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत, तर नवनिर्वाचित
सरपंच, सदस्यांचा सत्कार करण्यात आला.