Breaking News

रस्ता दुरुस्तीसाठी शिक्षकाचा पुढाकार

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाड्यापर्यंत जाणार्‍या रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून साधी डागडुजीही झाली नव्हती. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली होती. येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक राजेंद्र खैरे आणि स्वदेस फाऊंडेशनचे प्रोजेक्ट कोऑर्डीनेटर दीपक मेनन यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन श्रमदानातून हा रस्ता सुकर केला आहे. ही रस्ता दुरूस्तीची मोहीम तीन दिवसांत पूर्ण झाली.

शिक्षक राजेंद्र खैरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व ग्रामस्थ एकत्र आले. त्यांनी हाती फावडे, कुदळ, घमेले आदी साहित्य घेऊन रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेली खडी व दगड व्यवस्थित पसरले. मोठे दगड हटविण्यात आले. आजूबाजूची झाडेझुडपे तोडली. त्यानंतर रस्त्यावर पसरलेल्या दगडांवर बुरूम व मातीचा भराव टाकून रस्ता सुस्थितीत केला. 

कोंडी धनगरवाडा येथील कोंडजाई देवी ठाकरे घराण्याचे कुलदैवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह  ठाकरे कुटुंबीय नेहमी कोंडजाई देवीच्या दर्शनासाठी येतात, मात्र येथील बिकट रस्त्याकडे कोणाचेही लक्ष गेलेले नाही.

सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाड्यापर्यंत एसटीची सुविधा नाही. येथून चार-साडेचार किमी अंतरावर नागशेत गावाला एसटी येते, मात्र नागशेत ते कोंडी धनगरवाड्यापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला होता.

मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची साधी डागडुजीदेखील झाली नव्हती. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिक्षक राजेंद्र खैरे व स्वदेसचे दीपक मेमन यांनी ग्रामस्थांना एकत्र केले. या श्रमदान मोहिमेत राजेंद्र खैरे, दीपक मेनन, ग्रामपंचायत सदस्य बाळू ढेबे, ग्रामस्थ प्रकाश ढेबे, विशाल ढेबे, रामचंद्र बावधाने, दगडू कोकरे, मंगेश ढेबे, सुनील हिलम, भाऊ बावधाने, दगडू गोरे, लक्ष्मण ढेबे, नामदेव ढेबे, पांडुरंग ढेबे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply