ठाणे ः प्रतिनिधी
एका टेम्पो ट्रॅव्हलर बसच्या धडकेमध्ये बारावी परीक्षेचा इंग्रजीचा पेपर द्यायला निघालेला रोहित चंदनशिवे (19) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 10 वा.च्या सुमारास तीनहात नाका येथे घडली. याप्रकरणी बसचालक संदीलकुमार पुजारी (36) याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. गंभीर जखमी झाल्याने पहिल्या दिवसापासूनच सदर विद्यार्थी परीक्षेस मुकला आहे. मुंबई-नाशिक पूर्व द्रुतगती मार्गावर तीनहात नाका येथे सुरेश हा पायी सिग्नल क्रॉस करत असताना भरधाव वेगाने आलेल्या बसने त्याला उडवले. यात डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. नागरिकांच्या मदतीने त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता तो धोक्याबाहेर आहे, मात्र मानसिक धक्का बसल्याने तो पुढील पेपर देऊ शकेल की नाही हे सांगता येणार नसल्याचे डॉ. शेखर सुराडकर यांनी सांगितले.