Breaking News

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चेच नाव हवे!

राज्यात सध्या नामांतराचा मुद्दा प्रचंड गाजतोय. औरंगाबादसह अन्य ठिकाणांच्या नामांतरावरून मतमतांतरे व्यक्त होत असतानाच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला आहे. त्यामुळे पनवेल, उरणसह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई विमानतळ प्रकल्प साकारला जात आहे. त्यात पनवेल तालुक्यातील 10 गावे विस्थापित झाली असून, या प्रकल्पाचा प्रभाव पनवेल, उरणसह नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यावर होऊन येथील विकासाला चालना मिळणार आहे. त्या द़ृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे. विविध प्रकल्प, आस्थापना आणि औद्योगीकरणामुळे आज या भागाला चांगले दिवस आले असले तरी हे काही सहजासहजी घडलेले नाही. त्याकरिता प्रकल्पग्रस्तांना अनेक आंदोलने करावी लागली. हुतात्म्यांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले. सर्वपक्षीय नेतेमंडळींना शासन-प्रशासनाशी संघर्ष करावा लागला आणि या सार्‍यासाठी शेतकरी, कष्टकरी व प्रकल्पग्रस्तांचे झुंझार लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांनी आपले आयुष्य वेचले. ‘दिबां’चे कणखर व अभ्यासू नेतृत्व लाभणे हे प्रकल्पग्रस्तांचे भाग्यच म्हणावे लागेल.

स्थानिकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी लढवय्ये नेते दि. बा. पाटील योद्ध्याप्रमाणे अखेरच्या श्वासापर्यंत लढले. 1980च्या दशकात पनवेल, उरण, नवी मुंबईतील जमिनी सिडको, जेएनपीटीने संपादित केल्या, मात्र त्यापोटी देऊ केलेला मोबदला अल्प असल्याने प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये नेते दि. बा. पाटील यांनी जबरदस्त लढा उभारला. 1984 साली जासई व पागोटे येथे झालेल्या शेतकरी लढ्यात पाच जण हुतात्मा झाले, तर स्वत: ‘दिबा’ जखमी झाले. अखेर जमीन संपादनापोटी 12.5 टक्के भूखंडाचे तत्त्व लागू झाले. हा कायदा संपूर्ण राज्यभरासाठी मंजूर झाला. नवी मुंबई विमानतळबाधितांना तर आर्थिक मोबदला आणि सोयीसुविधांसह 22.5 टक्के भूखंड देण्याचे मान्य करण्यात आले आहे. हे पॅकेज आजवर देशात दिलेल्यांपैकी सर्वांत मोठे मानले जाते. यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये त्यांचे दैवत ‘दिबां’विषयी कृतज्ञता आहे. ‘दिबा’ म्हणजे येथील अस्मिता, ‘दिबा’ म्हणजे अंगार आणि ‘दिबा’ म्हणजे भूमिपुत्रांची आन, बान, शान! म्हणूनच त्यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे, अशी येथील समस्त नागरिकांची एकमुखी मागणी आहे, जी रास्तच आहे.

एखाद्या गोष्टीचे नामांतर आणि नामकरण यामध्ये फरक आहे. नामांतर म्हणजे एखाद्या स्थळाचे नाव बदलणे, तर नामकरणाचा अर्थ नाव देणे असा होतो. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी सर्वांच्या मनात नितांत आदर आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्रासह त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही, पण त्यांचे नाव याआधी अनेक ठिकाणी देण्यात आले आहे. मध्यंतरी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्यात आले, तर दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद विमानतळालाही

बाळासाहेबांचे नाव देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरीसाठी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे पाठविला आहे. भविष्यातदेखील आणखी काही ठिकाणी बाळासाहेबांचे नाव देता येऊ शकेल, मात्र दि. बा. पाटील यांच्यासाठी नवी मुंबई विमानतळाचा एकमेव उचित पर्याय आहे. म्हणूनच प्रकल्पग्रस्त आणि त्यांच्या संघटना यासाठी आक्रमक झाल्या आहेत.

लोकनेते दि. बा. पाटील यांचा लढवय्या बाणा आणि दूरदृष्टीमुळे येथील प्रकल्पग्रस्तांना सुबत्ता आली. शिवाय त्यांच्या प्रयत्नांतून शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचून गोरगरीब, अशिक्षित मुले उच्चविद्याविभूषित झाली. अशा महापुरुषाचे नाव नवी मुंबई विमानतळाला देऊन शासनाने त्यांचा मरणोत्तर सन्मान करावा, अशी समस्त प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. ती मान्य न झाल्यास ‘दिबां’च्याच प्रेरणेने आंदोलन करण्यास प्रकल्पग्रस्त मागेपुढे पाहणार नाहीत. ‘दिबा’ यांची जयंती येत्या 13 जानेवारी रोजी साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जनभावना लक्षात घेत पनवेल परिसरात होत असलेल्या विमानतळासाठी ’दिबा’ यांच्या नावावर शासनाने शिक्कामोर्तब करावे. यातून ‘दिबां’च्या कार्याचा खर्‍या अर्थाने गौरव होईल आणि त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील.

आमदार प्रशांत ठाकूर यांची आग्रही मागणी

पनवेलचे आमदार आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली आहे. ‘दिबां’चे कार्य सर्वांना माहीत आहे. म्हणूनच स्थानिकांच्या हृदयातील या नेत्याचे नाव येथील विमानतळाला द्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे. भाजपपाठोपाठ रिपाइं (आठवले गट)चे कोकण अध्यक्ष व पनवेलचे उपमहापौर जगदिश गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनीही ‘दिबां’च्या नावाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. अन्य काही पक्षांचे नेतेही या नावासाठी अनुकूल आहेत, मात्र स्थानिक शिवसेना नेत्यांच्या भूमिकेत स्पष्टता दिसत नाही. खरंतर जशी एकजूट यापूर्वी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध आंदोलनांमध्ये सर्व राजकीय पक्षांनी दाखविली होती एकीची तीच वज्रमूठ आता ‘दिबां’साठी आवळण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्वसमावेशक चळवळ उभारणे आवश्यक असून, विशेषत: तरुणाईने पुढाकार व सक्रिय सहभाग घेणे अपेक्षित आहे.

-समाधान पाटील, अधोरेखित

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply