Breaking News

कारची ट्रॅक्टरला धडक

 पोलीस अधिकार्‍याचा मृत्यू; दोन सहकारी जखमी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

सीबीडी येथील पोलीस मुख्यालयातील सहायक उपनिरीक्षक सूर्यकांत गायकवाड (वय 54) यांचा अपघाती मृत्यू झाला. इंदापूर मार्गावरील भिगवण परिसरात गुरुवारी (दि. 18) सकाळी त्यांचा अपघात झाला. त्यांच्या कारने ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला.

मागील काही दिवसांपासून नवी मुंबई पोलीस दलात अनेक दु:खद घटना घडत आहेत. अशातच गुरुवारी सकाळी पुन्हा एका पोलीस अधिकार्‍याचे निधन झाले. सहाय्यक उपनिरीक्षक सूर्यकांत गायकवाड हे उरण येथे सहकुटुंब वास्तव्यास होते. दोन वर्षांपूर्वी उरण पोलीस ठाण्यातून त्यांची सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात राखीव विभागात बदली झाली होती. सध्या ते दोन दिवसांची सुटी घेऊन सोलापूर येथील सलगर वस्ती येथील मूळ गावी गेले होते.

गुरुवारी सुट संपत असल्याने नोकरीवर हजर होण्यासाठी बुधवारी रात्री गावावरून निघाले होते. पहाटेच्या सुमारास त्यांची कार इंदापूर मार्गावर भिगवण येथे आली असता समोर चाललेल्या ट्रॅक्टरला कारने मागून धडक दिली. अपघातावेळी गायकवाड हे कार चालकाच्या बाजूच्या सीटवर बसले होते. तर कारमध्ये त्यांचे इतर दोन मित्र होते. अपघातामध्ये गायकवाड ज्या बाजूला बसले होते, तो भाग ट्रॅक्टरच्या मागच्या भागावर धडकला. यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

सूर्यकांत गायकवाड यांचे दोन सहकारी अपघातात जखमी झाले असून त्यांची प्रकृती ठीक आहे. अपघाताची माहिती मिळताच त्यांची पत्नी व दोन मुले, मुलगी व जावई यांनी उरण येथून गावाकडे धाव घेतली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply