Breaking News

काँग्रेस पक्षामध्ये राजीनामासत्र सुरूच ; मुंबई अध्यक्षपदावरून मिलिंद देवरा पायउतार

मुंबई : प्रतिनिधी

लोकसभेतील पराभवाची जबाबदारी घेत माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे देवरा यांनी स्पष्ट केले आहे, तसेच राजीनामा देतानाच आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची तात्पुरती स्थापना करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

– ज्योतिरादित्य सिंधिया यांचाही राजीनामा

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरवरून त्यांनी राजीनाम्याची माहिती दिली. ट्विटमध्ये सिंधिया यांनी म्हटले आहे की, लोकांचा निर्णय स्वीकारत आणि त्याची जबाबदारी घेत मी राहुल गांधी यांना माझा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा सादर केलाय.

– हा राजीनामा की वरच्या पदाची शिडी?

मुंबई : राजीनामा दिलेले मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यावर काँग्रेस नेते आणि माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी टीका केली आहे. देवरा यांच्या राजीनाम्यानंतर निरुपम यांनी ट्विट केले. त्यांनी लिहिले, ’राजीनाम्यात त्यागाची भावना अंतर्भूत असते. येथे तर दुसर्‍या क्षणाला राष्ट्रीय पातळीवरचे पद मागितले जात आहे. हा राजीनामा आहे की वर जाण्याची शिडी? पक्षाने अशा कर्मठ लोकांपासून सावध राहावे.’ तत्पूर्वी, निरुपम यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाऐवजी तीनसदस्यीय समिती स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दलही नाराजी व्यक्त केली. यामुळे पक्षाचे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यावरून काँग्रेसमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply