Breaking News

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू, कुलसचिवांसह पाच जणांविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

पुणे : प्रतिनिधी  – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्यासह पाच जणांविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यान्वये (अ‍ॅट्रोसिटी) चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. करमळकर, प्रफुल्ल पवार यांच्यासह सिनेट सदस्य संजय चाकणे, सुरक्षा संचालक सुरेश भोसले, सुरक्षा रक्षक भुरसिंग अजितसिंग राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश भीमराव भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, आकाश भोसले हे विद्यापीठातील मराठी विभागामध्ये एमफील करीत आहे. विद्यापीठातील विविध प्रश्नावर त्यांनी आवाज उठविला आहे. कुलगुरू, कुलसचिव यांच्यासह पाच जणांना भोसले हे अनुसूचित जाती आणि जमातीमधील असल्याचे माहीत असल्याने सदर पाच जणांनी जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्यासाठी जातीय द्वेषातून विद्यापीठाच्या एका प्रकरणात एक एप्रिल 2019 रोजी त्यांच्याविरुद्ध खोटे आणि गंभीर गुन्हे दाखल केले.

1 एप्रिल रोजी विद्यापीठाने जेवणाच्या प्रश्नावरून अचानक काढलेल्या एका परिपत्रकाबद्दल विद्यापीठातील रिफेक्टरीसमोर सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत 150 ते 200 विद्यार्थी गोंधळ घालत होते. त्यावेळी भोसले हे त्यांच्या वृत्तवाहिनीसाठी वार्तांकन करत होते. हा गोंधळ सुरू असताना तिथे विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक आणि चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, तसेच कर्मचारी पाहत होते.

विद्यापीठाविरुद्ध सातत्याने बातम्या प्रसिद्ध करीत असल्याने विद्यापीठ प्रशासनाने आपल्याविरुद्ध आपणास मानसिक त्रास देण्यासाठी, शैक्षणिक करियर खराब करण्यासाठी जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार करीत आहेत.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply