
उरण : वार्ताहर
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार (दि. 8) उरण तालुक्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. त्यापैकीच दाखले वाटप कार्यक्रम झाला. जेएनपीटी टाऊनशीप मल्टीपर्पज हॉल येथे विविध शासकीय दाखले यामध्ये ज्येष्ठ नागरिक व वय, अधिवास (डोमेसाईल) असे सुमारे पाच हजार 832 दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी या वेळी कामगार नेते सुरेश पाटील, उरण तहसीलदार कल्पना गोडे, न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेलकर, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मृणालिनी कदम, नितीन भोईर, विजय भोईर, सुनील देवलरकर, प्रकाश कडू व श्रीसदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीसदस्यांनी पाच ते सहा महिने नागरिकांच्या घरी जाऊन दाखल्यांसाठी लागणारी कागद पत्रे गोळा केली व नागरिकांची होणारी धावपळ, वेळेची बचत केली व नागरिकांना चांगल्या प्रकारे मदतीचा हात दिला. प्रतिष्ठानच्या वतीने एकूण 27 समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जाते. चिरनेरजवळील टाकीगाव येथे श्रीसदस्यांनी वृक्षारोपण केले.खोपटा गावातील श्रीसदस्यांनी शाळेच्या विद्यार्थांसाठी दप्तर वाटप केले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.