महाड : प्रतिनिधी
येथील युथ क्लबने आयोजित केलेल्या रायगड प्रदक्षिणेमध्ये आजोबा, मुलगा आणि नातवाने एकाच वेळी सहभाग घेतला होता. पाच वेळा रायगडला प्रदक्षिणा करणारे 69 वर्षीय विनायक केळकर आणि 75 वर्षांचे देशपांडे आजोबा यांनी त्यांचा मुलगा व नातवासह ही प्रदक्षिणा पूर्ण केली. युथ क्लबच्या या विक्रमी व शिस्तबद्ध रायगड प्रदक्षिणेने आपण प्रभावित झालो असून, या स्तुत्य उपक्रमास सर्व शासकीय मदत देण्यास मला आनंद होईल, असे महाडचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी या वेळी सांगितले. युथ क्लब संस्थेने जिल्हा परिषदेच्या आर्थिक सहाय्याने घेतलेल्या या राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा मोहिमेत सुमारे 750 प्रदक्षिणार्थी सहभागी झाले होते. शिवाजी महाराजांच्या जयघोषात सकाळी सहा वाजता सुरू झालेली ही प्रदक्षिणा संध्याकाळी पाच वाजता पूर्णत्वास आली. या वेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, वैशाली माने, महाड तहसीलदार चंद्रकांत पवार, पोलादपूर तहसीलदार दीप्ती देसाई, महाडचे नायब तहसीलदार प्रदीप कुडाळ, अरविंद घेमूड, महेंद्र महाडिक, नवनीत महाडिक, कार्यकारी अभियंता बाळासाहेब झंजे व सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रदक्षिणार्थींना प्रशस्तिपत्रक देण्यात आले.युथ क्लबच्या सर्व सभासदांनी अथक परिश्रम करून रायगड प्रदक्षिणा यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला. या प्रदक्षिणेसाठी पाचाड आरोग्य केंद्राने स्ट्रेचरची व्यवस्था केली, तसेच पाचाडचे सरपंच व ग्रामस्थांनी सहकार्य केले.