बंद कारखान्यात रसायनाने भरलेले ड्रम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष


महाड : प्रतिनिधी
येथील औद्योगिक क्षेत्रातील सिल्व्हालायकल या बंद कारखान्यात बुधवारी (दि. 10) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. महाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी रसायनाने भरलेले ड्रम होते. आग आटोक्यात आली नसती तर मोठी हानी झाली असती. या औद्योगीक वसाहतीमधील बंद कंपन्यांतील रसायनांकडे महाड प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळेझाक करीत आहे.
महाड एमआयडीसीमधील सिल्व्हालायकल ही कंपनी गेल्या वीस वर्षापासून बंद आहे. या बंद कंपनीतील भंगार काढण्याचे काम सध्या सुरु आहे. यामुळे जागोजागी वेल्डिंग आणि इतर कामे सुरू आहेत. या कंपनीत बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे कारण समजले नसले तरी ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी या बंद कंपनीचे रसायनाने भरलेले ड्रम होते. मात्र आग तत्काळ आटोक्यात आणली गेल्याने मोठी हानी टळली आहे. सदर विविध ठिकाणी रसायनाने भरलेल्या गोणी, ड्रम तसेच पडून आहेत. महाड एमआयडीसीमध्ये अनेक बंद कारखान्यात अशीच अवस्था आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात यातील रसायन पाण्यामुळे बाहेर पडत असतात. तर कारखाना बंद असल्याने स्थानिक नागरिकांची जनावरे या ठिकाणी वावरत असतात. याचा त्रास जनावरे आणि नागरिकांना होवू शकतो. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळेझाक करून आहे. या बंद कंपनीत भंगार व्यवसाईक भंगार तोडण्याचे असुरक्षित काम करत आहेत. या कामगारांकडे कोणतीच सुरक्षा साधने दिसून येत नसल्याने कामगार सुरक्षा विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.