दोन आरोपींकडून चोरीची 10 वाहने हस्तगत
पोलादपूर : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील कोडोली परिसरात दोघा इसमांकडे चोरीची टूव्हिलर आढळून आल्यानंतर त्यांची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून तब्बल 10 वाहने हस्तगत करण्यात आली. त्यामध्ये पोलादपूर शहरातील चोरलेली नेक्सा बलेनो कारदेखील असल्याचे उघडकीस आले आहे. पोलादपूर शहरातील शिवाजीनगर येथील किराणामालाचे व्यापारी अभिजित मेहता यांची मारूती सुझुकी कंपनीची नेक्सा बलेनो ही कार (एमएच-12, क्यूएफ-6335) मे महिन्यामध्ये चोरीस गेली होती. याबाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलादपूर पोलीस ठाण्याचे हवालदार व्ही. जी. चव्हाण अधिक तपास करीत होते. याप्रकरणी सीसीटिव्ही कॅमेर्याचे फुटेज प्राप्त होऊनही तपासाला गती मिळत नव्हती. दरम्यान, सातारा पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरिक्षक सागर गवसणे हे त्यांच्या पथकासह कोडोली परिसरात गस्त घालत असताना राहुल रमेश गुजर (वय 27, रा. गोडोली) आणि शंभू जगन्नाथ भोसले (वय 21, रा. कोडोली) हे दोन इसम चोरीची टूव्हीलर घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपासात त्यांच्याकडून 7 टूव्हीलर, 2 ऑम्नी कार आणि 1 बलेनो कार अशी 10 वाहने हस्तगत करण्यात आली. त्यात पोलादपूरमधील चोरलेल्या नेक्सा बलेनो कारचादेखील समावेश आहे.