Breaking News

माथेरान पालिकेच्या बीजे हॉस्पिटल कर्मचार्यांचा मनमानी कारभार

कर्जत ः बातमीदार

माथेरानमध्ये वैद्यकीय सेवा अपुरी असून प्राथमिक उपचार करण्यासाठी माथेरान गिरीस्थान नगरपालिका यांच्या अखत्यारित असलेल्या बीजे हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.आजारी रुग्ण दवाखान्यात दाखल होऊनही एकही कर्मचारी दवाखान्यात हजर नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे माथेरानमधील आरोग्य समस्या गहन होत चालली आहे. माथेरान नगरपालिका यांच्यामार्फत या दवाखान्यावर देखरेख ठेवली जाते. आरिफा शेख हिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. तेव्हा 108 रुग्णवाहिकेतून तिला माथेरानच्या बीजे रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पोहोचल्यावर तिच्या नातेवाइकांच्या लक्षात आले की हॉस्पिटलमध्ये कोणीही कर्मचारी नाही. पोटदुखी खूप वाढत होती. दरम्यान, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी फोनद्वारे मुख्याधिकार्‍यांशी संपर्क साधला. उपचार करण्यासाठी आपल्याला पालिकेचा लेखी आदेश नसल्यामुळे येथील नियुक्त डॉक्टर वसुंधरा सिंग यांना सांगितले. तब्बल एक तासानंतर डॉ. वसुंधरा सिंग यांनी तिच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. सध्या माथेरानमध्ये पावसाळा सुरू आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत ना वॉर्ड बॉय, ना परिचारिका. तेव्हा या हॉस्पिटलकडे नगरपालिकेचे लक्ष आहे की नाही, कर्मचारी सर्व नियम धाब्यावर बसवून मर्जीप्रमाणे हॉस्पिटल सोडून जातात, यांच्यावर अंकुश ठेवणार कोण, असा सवाल रुग्णाचे नातेवाईक विचारत आहेत.

माथेरानमधील बीजे हॉस्पिटलमधील घटना समर्थनीय नाही. जे कर्मचारी मनमानी पद्धतीने हॉस्पिटलमध्ये हजर नसतील त्यांच्यावर कडक कारवाई करणार व यापुढे मी स्वतः हॉस्पिटलवर लक्ष केंद्रित करणार आहे.

-रामदास कोकरे, मुख्याधिकारी

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply