
खोपेाली ः प्रतिनिधी
सध्या नगरपालिकेचा कारभार लोकप्रतिनिधी पाहतात की ठेकेदार, असा सवाल नागरिकांना पडला तर नवल नाही. अनेकदा लोकप्रतिनिधींनी सांगितल्यानंतरही ठेकेदार ऐकत नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहे. खोपोली नगरपालिका हद्दीतील लौजी गावातील पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेकदा रस्त्याच्या डांबरीकरणाचे गाजर दाखवून लोकप्रतिनिधी व प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. लव्हेज गावातील प्राथमिक शाळेपासून मागील निर्मल सोसायटीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर होता पण शाळेपासून सार्वजनिक शौचालयापर्यंत डांबरीकरण करण्यात आले. पुढचा रस्ता पुढील वर्षात केला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पण गेले तीन वर्षे डांबरीकरणाचे काम रखडले. आता त्या कच्च्या रस्त्यावर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. चिखलामुळे वाहने घसरण्याचे व किरकोळ अपघाताची मालिका सुरू आहे. दरम्यान, यासंदर्भात स्थानिकांनी नगरसेवक व प्रशासनाला याबाबत खडी टाकण्यासाठी विनंती केली. काहींनी नगराध्यक्षांना कल्पना दिली. नगराध्यक्षांनी तत्काळ संबंधित ठेकेदाराला दूरध्वनीवरून आदेश दिले, पण गेली 10 दिवस ठेकेदाराने नगराध्यक्षांचा आदेशही मानला नाही. यावरून ठेकेदार आता लोकप्रतिनिधींचेही ऐकत नाही तर नागरिकांचे काय, ठेकेदार मुजोर झाले व यास लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याचा सूर कानावर पडत आहे.