Sunday , October 1 2023
Breaking News

मोदींची स्पष्टोक्ती दिलासादायक

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे आता सूड उगवलाच पाहिजे अशी भावना देशभरातील सर्वसामान्यांकडून व्यक्त होऊ लागली. युद्ध वा सुडाच्या भावनेने पेटून केलेली कारवाई या प्रश्नात उपयोगाची नाही असे मत काही तज्ज्ञांनी तत्काळ व्यक्त केले होते. परंतु सर्वसामान्य असे काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. परंतु आता काही दिवसांचा काळ लोटून गेल्यानंतर संयमी प्रतिक्रियेचा आग्रह अनेकांकडून व्यक्त होतो आहे.

‘आमची लढाई मानवतेच्या शत्रूविरोधात आहे. आमची लढाई काश्मीरसाठी आहे, काश्मिरींच्या विरोधात नव्हे’, असे नि:संदिग्ध विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राजस्थानातील एका जाहीर सभेत केले. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाल्यानंतर देशभरात उफाळून आलेल्या संतापाची झळ काही प्रमाणात ठिकठिकाणी वास्तव्यास असलेल्या काश्मिरी विद्यार्थी आणि नागरिकांना बसली होती. काही ठिकाणी या रोषामुळे काश्मिरी नागरिकांना आपापल्या निवासाबाहेर पडणे कठीण झाले. काही विद्यार्थ्यांनी कसेबसे होस्टेल सोडून आपापल्या मूळ गावी परतणे पसंत केले. या सार्‍या पार्श्वभूमीवर स्वत: पंतप्रधान मोदी यांनी केलेले हे स्पष्ट विधान खूपच महत्त्वाचे आहे. गेली तीन दशके काश्मीर दहशतवादाच्या वणव्यात होरपळते आहे. एकीकडे पाकिस्तानकडून फुटीरवाद्यांना मिळणारा खुला पाठिंबा, दुसरीकडे खोर्‍यातील भारतीय लष्कराच्या कायमस्वरुपी वास्तव्यामुळे राज्यभरातली युद्धसदृश परिस्थिती, कोलमडलेला पर्यटनाचा व्यवसाय या सार्‍यामुळे सर्वसामान्य काश्मिरी जनतेचे आयुष्य वैफल्यग्रस्त झालेले असताना अशा एखाद्या मोठ्या दहशतवादी घटनेनंतर त्यांची अवस्था किती बिकट होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्यामुळेच मोदींचे हे विधान त्यांच्यासाठी दिलासादायक ठरते. सुडाच्या भावनेने पेटून उठून कारवाई करणार्‍यांच्या हाती काहीही ठोस लागत नाही, याचे अनेक दाखले नजीकच्या इतिहासातल्या जगभरातल्या घटनांतून देता येतील. पण अन्य कुणी याविषयी बोलण्यापेक्षा खुद्द मोदींनीच जनमत त्याकडे वळवणे हेच सर्वात प्रभावी ठरावे. दहशतवादाच्या वणव्यात काश्मीरमधील मुले सर्वाधिक होरपळत आहेत. त्यामुळेच आपल्या दहशतवादाविरोधातल्या लढाई ती आपल्या सोबत आहेत आणि त्यांची साथ आपल्याला हवी आहे, असे नि:संदिग्ध विधान मोदी यांनी केले आहे. अमरनाथ यात्रींवरील हल्ल्याच्या वेळी काश्मिरींनी त्यांना वाचवण्यासाठी आपले रक्त दिले होते याचीही आठवण मोदींनी यावेळी करून दिली हे बरे झाले. दहशतवादविरोधातल्या लढाईला हिंदु-मुस्लिम संघर्षाचे रूप देणार्‍यांना आपली चूक यातून लक्षात यावी. ही लढाई मानवतेच्या शत्रूच्या विरोधातली आहे हे मोदींनी सांगितल्यामुळे अविवेकाने बोलणार्‍या-वागणार्‍यांना आतातरी भान येईल. काश्मीर प्रश्न गुंतागुंतीचा आहेच, पण दहशतवादाचा गुंता हा त्याहूनही मोठा आहे. त्याविरोधातली लढाई इतकी सहज-सोपी नाही. पाकिस्तानची फूस असलेल्या दहशतवादी संघटना सैरभैर झालेल्या काश्मिरींना हाताशी धरून परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करीत आल्या आहेत आणि करीत राहणार आहेत. त्याचे निराकरण गोरगरीब स्थानिक काश्मिरी जनतेला वेठीस धरून कदापि होणार नाही. त्याविरोधातील आपली युद्धनीती ही विचारपूर्वकच आखायला हवी आहे. शांतता प्रक्रियेला खीळ घालायची हाच तर दहशतवादी हल्ले करणार्‍यांचा प्रमुख हेतू असतो. आपली अविवेकी भावनिक प्रतिक्रिया ही त्यांनाच सोयीची ठरते हे देशप्रेमी नागरिकांनी लक्षात घेतले तरच मोदींचे विधान सार्थकी लागेल.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply