पनवेल ः बातमीदार – रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा 30वा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला. या समारंभात पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून प्रिया पाटील यांनी मावळते अध्यक्ष डॉ. रमेश पटेल यांच्याकडून पदभार स्वीकारला.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नियोजित (2021-22) प्रांतपाल पंकज शहा, माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, सहाय्यक प्रांतपाल शिरीष वारंगे, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण उपस्थित होते.
या वेळी क्लबचे नवनिर्वाचित पदाधिकारी घोषित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सचिव सायली सातवळकर, श्वेता वारंगे, संचालिका डॉ. संजीवनी गुणे, संपादिका आरती खेर आदी महिला सदस्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर खजिनदारपदी दर्शन वनगे व इतर संचालक म्हणून दीपक गाडगे, ऋषिकेश बुवा, सुदीप गायकवाड, विवेक वेलणकर, माजी अध्यक्ष भगवान पाटील, अनिल ठकेकर, डॉ. अमोद दिवेकर, डॉ. अभय गुरसाळे, डॉ. रमेश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. विशेष संचालक म्हणून माजी अध्यक्ष संतोष घोडिंदे, डॉ. हितेन शहा, धनंजय सोहनी यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात आषाढी एकादशीनिमित विठ्ठल वंदनेने करण्यात आली. यात मेधा गाडगीळ, नीता कदम, पुष्पलता चंदने व अनेट आदी पोटे यांचा समावेश होता.
या वेळी अध्यक्षा प्रिया पाटील यांनी काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प करण्याचे योजले असून, प्रामुख्याने दिव्यांगांसाठी आधार सेंटर, हॅपी स्कूल प्रकल्प, इकोफ्रेंडली गणेशमूर्ती, बल्लाळेश्वर रोटरी गणेश विसर्जन तलाव सुशोभीकरण या प्रकल्पांना प्राधान्य देण्याचा मानस व्यक्त केला.
या समारंभात मोहन बापट यांना सेवाश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आरती खेर यांनी आगळ्यावेगळ्या ऑडिओ व्हिज्युअल्स माध्यमातून सेंट्रल न्यूज हे क्लबचे बातमीपत्र प्रसारित केले. हा समारंभ ववेक खाड्ये यांनी त्यांच्या विशिष्ट शैलीने आयोजित केला. डॉ अमोद दिवेकर यांनी सर्वांचे आभार मानले.