मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला पहिल्या टप्प्यात पळस्पे फाटा ते इंदापूर दरम्यान सुरुवात झाल्यानंतर गेल्या 2013 या वर्षी गणेशोत्सव काळात लोकसभेमध्ये कोकणातील माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी आवाज उठविला. त्यानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी तरी खड्डे बुजविण्यासाठी मलमपट्टी सुरू झाल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात पाहण्यास मिळाले. त्यानंतर 2013 या वर्षी सुनील तटकरे यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे संबंधित ठेकेदारांनी तातडीने बुजविले नाहीत, तर गुन्हा दाखल करण्याचा इशारादेखील दिला होता. त्यानंतर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी करून तातडीच्या उपाययोजना करण्यास भाग पाडले, पण त्या उपाययोजना तात्पुरत्या ठरल्या आणि पुन्हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यांनी व्यापला. रायगडचे त्यानंतरचे पालकमंत्री सचिन अहिर आणि रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे व इतर अधिकारी यांनी मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामातील खड्ड्यांची पाहणी करून 15 ऑगस्ट 2014 पूर्वी खड्डे बुजविण्याचे काम ठेकेदार कंपन्या सुप्रीम व महावीर इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडून पूर्ण न झाल्यास दोन्ही ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची घोषणा पेण तालुक्यातील तरणखोप येथे केली होती. यंदा मात्र या दोन्ही ठेकेदार कंपन्यांनी पालकमंत्री अहिर यांच्या आदेशाकडे सपशेल दुर्लक्ष करीत सर्वांचाच प्रवास खडतर करून ठेवला. आजही महामार्ग खड्डेमुक्त झालेला नसल्याने तरणखोप येथे ठरल्यानुसार प्रवाशांच्या जीवाशी खेळणार्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि सुप्रीम व महावीर इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्ही कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची, तसेच महामार्गाचे रुंदीकरणाचे काम दुसर्या कंत्राटदाराला देण्याची मागणी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने संतोष ठाकूर यांनी केली होती.
या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या सप्ताहाअखेरीस पोलादपूर कशेडी घाटाने दोन महत्त्वाच्या घटना पाहिल्या. पहिल्या घटनेमध्ये खड्ड्यांमुळे टँकरवरील नियंत्रण ढळल्याने टँकर दरीत कोसळताना वाचला, तर याच कशेडी घाटाला पर्यायासाठी खोदल्या जाणार्या भुयारीमार्गाची पाहणी, तसेच वडखळ बाह्यवळण पुलाचे लोकार्पण केले. यामुळे खड्डेमय रस्त्याचा महत्त्वाचा वडखळ ते पेण टप्पा आता सुसह्य होऊन तिथे सहा तासांपर्यंतची वाहतूक कोंडी होण्याचा प्रकार काही तासांनी कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे. लक्झरी बसेस, कन्टेनर, टँकर, ट्रकसारखी अवजड वाहने आणि जीप, कार, पिकअप, टेम्पो, मिनीबससारखे लहान प्रवासी व मालवाहू वाहने या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या संख्येने रहदारी करीत असतात. या वाहनांच्या ड्रायव्हरकडून या खड्ड्यांतून टायर जाण्याचे वाचविण्याचे प्रयत्न सातत्याने होत असल्याने खड्डे मुबलक असलेल्या ठिकाणी या वाहनांचा नागमोडी प्रवास सुरू असतो. राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात झाली असून यापूर्वीचे दोन प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत, मात्र सध्या होत असलेल्या चौपदरीकरणाच्या मागणीसह सर्वच रस्ते पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद होऊ शकली नसल्याने अद्याप कोकणातील रस्तेवाहतूक सावरलेली दिसत नाही. यापूर्वीच्या सरकारने देऊ केलेला कोकण पॅकेजचा फुगा प्रत्यक्षात कामे पूर्णत्वास जाऊ शकली नसल्याने केव्हाच फुटला आहे.
2005 च्या अतिवृष्टीपूर्वी 20 मे 2005 रोजी पनवेल तालुक्यातील पळस्पे ते पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटापर्यंत नॅशनल हायवेची पाहणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. रवीशेठ पाटील यांनी केली होती, मात्र त्यानंतर अल्पावधीतच झालेल्या अतिवृष्टीदरम्यान नॅशनल हायवेसह रायगड जिल्हा परिषदेचे सर्व रस्ते होत्याचे नव्हते झाले. अशातच, मुंबई ते गोवा नॅशनल हायवे क्र. 66 वरील खड्ड्यांचे वाढते साम्राज्य राज्यकर्त्यांच्या चर्चेचा आणि कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्या चाकरमान्यांच्या चिंतेचा विषय होऊ पाहात आहे. मुंबई-गोवा नॅशनल हायवे क्र. 66 वर पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयासमोर ग्रामदेवतेच्या जत्रोत्सवादरम्यान सातत्याने अपघात होत असत. याबाबतच्या पाठपुराव्यामुळे नॅशनल हायवे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी असलेला तीव्र उतार कमी केला आणि तेव्हापासून या ठिकाणी अपघातात कोणाचाही जीव गेलेला नाही, मात्र या ठिकाणी दरवर्षी सातत्याने खड्ड्यांचे प्रमाण वाढत असून साईडपट्टीवरील भरावाची माती उकरून किरकोळ डागडुजी करण्याचे येथे केले जाणारे प्रयत्न तात्पुरती मलमपट्टी ठरून निरुपयोगी होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे हे खड्डे चुकविण्यासाठी टू व्हिलर आणि छोट्या फोरव्हिलरचे ड्रायव्हर या ठिकाणी वेडीवाकडी स्टेअरिंग फिरवून समोरून येणार्या वाहनांचा अंदाज चुकवित असल्याने अपघाताची शक्यता पुन्हा निर्माण झाली आहे. बीएण्डसीचे इंजिनियर देशपांडे यांनी या खड्डाप्रवण रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात या आश्वासनावर कृती झाली नसल्याने सर्वच वाहनचालकांना खड्डे चुकविण्याचे कसब दाखविताना पावसापूर्वी केवळ मातीने भराव केलेल्या साईडपट्टीवर उतरून अपघातांना निमंत्रण द्यावे लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे खड्डेपुराण आणि त्याचे रडगाणे दरवर्षीचेच झाल्याने या रस्त्याची पाहणी करण्यासाठी मंत्रिमहोदयांचा दौरा करण्याची परंपरा या सरकारने खंडित केली असली, तरी खड्डेयुक्त रस्त्याची परंपरा मात्र नित्यनेमाने सुरूच राहिली आहे. आजही महामार्ग खड्डेमुक्त झालेला नसल्याने तरणखोप येथे ठरल्यानुसार प्रवाशांच्या जीवाशी खेळणार्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि सुप्रीम व महावीर इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्ही कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची, तसेच महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम दुसर्या कंत्राटदाराला देण्याची मागणी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने संतोष ठाकूर यांनी केली होती, मात्र ना रस्त्यांना खड्डे दाद देत ना गुन्हा दाखल करण्याच्या धमक्यांना ठेकेदार कंपन्या दाद देत, अशी परिस्थिती वारंवार दिसून येत आहे. कोकणच्या विकासाची लाईफलाईन अशी खड्ड्यांच्या गर्तेत अडकलेली पाहिल्यानंतर कोकणचा विकास साध्य करून कॅलिफोर्निया करण्याची स्वप्नं पूर्ण कोण करणार, हा प्रश्न कायमच भेडसावत राहणार आहे. किमान मुख्यमंत्री फडणवीस यांनी तरी यासाठी राज्याचे सर्वतोपरी प्रयत्न करून केंद्राचीही भरगच्च मदत घेत खर्या अर्थाने पूर्ण करण्याची गरज आहे.
-शैलेश पालकर, खबरबात