पनवेल : प्रतिनिधी
स्थायी समिती समोर शुक्रवारी 6 मार्च सादर करण्यात आलेल्या पनवेल महापालिकेच्या 2019चा सुधारित व 2020-21 च्या अंदाज पत्रकाचा अभ्यास करण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी (दि. 12) बोलावण्यात आलेल्या स्थायी समिती सभेत उपस्थित सदस्यांच्या सूचनांची पाऊस पडल्याने अखेर वेळे अभावी इतर सदस्यांना देखील सूचना करण्यास वेळ मिळावा या हेतूने स्थायी समितीची सभा मंगळवारी (दि. 17)घेण्याचे ठरले.
स्थायी समितीसमोर शुक्रवारी
(दि. 6) सादर करण्यात आलेल्या पालिकेच्या 2019चा सुधारित व 2020-21 च्या अंदाज पत्रकावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी (दि. 12) रोजी स्थायी समितीची सभा बोलवण्यात आली होती. या वेळी उपस्थित सदस्यांच्या सूचनांचा पाऊस पडल्याने अखेर वेळे अभावी इतर सदस्यांना देखील सूचना करण्यास वेळ मिळावा या हेतूने सोमवारी (दि. 16) दुपारी 12 वाजेपर्यंत सदस्यांना लेखी सूचना स्थायी समिती समोर मांडण्यासाठी वेळ देण्यात आला असून त्यावर चर्चा करण्यासाठी व अंदाज पत्रकाला स्थायी समितीची मंजुरी देण्यासाठी मंगळवारी
(दि. 17) स्थायी समितीच्या सभेचे आयोजन करण्याचे ठरले. गुरुवारी (दि. 12) झालेल्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी स्वच्छतेसाठी करण्यात आलेल्या खर्चाच्या नियोजनावर आक्षेप घेत स्वच्छतेसाठी महिना 10 कोटी खर्च का लागतो असा सवाल उपस्थित केल्यावर आरोग्य विभाग अधिकारी गणेश पोशेट्टी यांनी दिलेल्या उत्तरात पालिका स्वच्छ भारत सर्वेक्षणात पालिकाहद्दीत नऊ हजार चौरस मीटर ग्राफिटीसाठी लाखो रुपये खर्च झाल्याचे सांगितल्याने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी खर्चावर आक्षेप घेत ग्राफिटी कुठे आणि किती आहे हे दाखवण्याची मागणी केली. चर्चे दरम्यान भाजप नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी नगरोत्थान करिता कमी रक्कमेचे नियोजन करण्यात आले असल्याचा उल्लेख केला.