पेण पालिका गटनेेते अनिरुद्ध पाटील यांचा निर्धार
पेण : प्रतिनिधी – भाजप पेण तालुका व शहर शाखेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पक्ष सदस्य नोंदणी अभियान व नवमतदार नोंदणी अभियानास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या अभियानातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करून भारतीय जनता पक्ष तालुक्यात आणखी सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन नगर परिषदेचे गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी केले.
भाजपच्या वतीने पेण शहराच्या मध्यवर्ती असलेल्या विना रेस्टॉरंटजवळ पक्ष सदस्य नोंदणी आणि नवमतदार नोंदणी अभियानाचे उद्घाटन गटनेते अनिरुद्ध पाटील व भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, नगर परिषद बांधकाम सभापती देवता साकोस्कर, महिला व बालकल्याण समिती सभापती शहेनाज मुजावर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, उपाध्यक्ष अजय क्षीरसागर, विस्तारक पंकज शहा, ज्येष्ठ नेते बापुराव साठे, प्रमोद मंडलिक, माजी बांधकाम सभापती प्रकाश पाटील, माजी नगरसेवक जनार्दन जाधव, प्रवीण पाटील, प्रभाकर म्हात्रे, अश्विन शहा, प्रशांत तेलवणे, कैलास जाधव, रोहन सोनावणे, विशाल शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
देशात भाजपची वाटचाल मोठ्या जोमाने सुरू असून, पेणमध्ये माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पक्षसदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. युवकवर्ग भाजपच्या पाठीशी असून येत्या निवडणुकीतही युवाशक्तीच्या माध्यमातूनच भाजप यश संपादन करेल, असा विश्वास अनिरुद्ध पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.
पेण नगर परिषद प्रभाग क्रमांक 6 व 7 मध्ये भाजप सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ करण्यात आला असून, यापुढे प्रत्येक प्रभागात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. भाजप सदस्य होण्यासाठी नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन शहर अध्यक्ष हिमांशु कोठारी यांनी या वेळी केले. या वेळी अनेक नागरिकांनी भाजप सदस्य नोंदणी केली, तसेच नवमतदारांनी देखील या अभियानाचा लाभ घेतला.