Breaking News

मनाई हुकूम

प्रशासनाने रायगडातील विशेषतः खालापूर कर्जतमधील धबधब्यांवर जाण्यास नागरिक, तसेच पर्यटकांना एक किमी परिसरात जाण्यास बंदी घातली आहे. 5 जुलै ते 8 सप्टेंबर 2019 या कालावधीत हा मनाई आदेश आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास पर्यटकांवर मुंबई पोलीस कायदा व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. हा मनाई आदेश किती सार्थ आहे याचा प्रत्यय गुरुवारी दि 11 जुलै 2019 रोजी झालेल्या नेरळ येथील टपालवाडी धबधब्यावर संजना शर्मा 17 नांदिवली कल्याण या मुलीच्या मृत्यूने आला.  डोहाच्या खोलीचा अंदाज न आल्याने संजना शर्माचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कॉलेजला जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर गेलेली संजना मित्रमैत्रिणींच्या  संगतीने थेट धबधब्यावर पोहचली होती. याच दिवशी वांगणी येथील गाव तलावात भरत घायाळ 37 बदलापूर या इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. निर्मिती गार्डन उमरोली पनवेल येथील गाढी नदीला आलेल्या पुराने पुलावरून पाणी वाहत असताना हरिश्चंद्र आंब्रे व त्यांची पत्नी सारिका हे मोटारसायकलसह वाहून गेले. गाढी नदीच्या पुलावरून पाणी वाहत जात असताना मोठा जमाव पाणी कमी होण्याची वाट पाहत होता.

हरिश्चंद्र आंब्रे यांनाही नागरिकांनी या पुलावरून जाण्यास मज्जाव केला होता, मात्र मोटारसायकल घसरल्याने हे दोघेही पाण्यात वाहत जात प्राणास मुकले. कर्जत, पनवेल, माणगाव, पेण, खोपोली, खालापुरातील धबधब्यांची पर्यटकांना पावसाळा सुरू झाला की विशेष आकर्षण असते आणि अतिउत्साहाच्या नादात मागील वर्षात रायगडात 18 जणांचा बुडून मृत्यू झाल्याने प्रशासनाने धरण, धबधबा क्षेत्राच्या 1 किमी अंतरापर्यंत जाण्यास मनाई आदेश दिला आहे. तशा आशयाचे  फलक स्थानिक पोलिसांनी लावले आहेत. मनाई आदेशाची पायमल्ली करणार्‍या पर्यटकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 14 जुलै 2019 रोजी पांडवकडा धबधबा खारघर येथे बंदी आदेश झुगारून गेलेल्या 29 पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई करीत अटक केली आहे. पांडवकडा धबधब्यावर मागील 5 वर्षात किमान 8 जणांचे प्राण गेले आहेत. जिल्ह्यातील मनाई आदेश लागू असणार्‍या ठिकाणी पोलिसांचा जागता पहारा ठेवण्यात आला आहे. तरीही सुटीच्या दिवशी सोलनपाडा धरण परिसरात पर्यटक दाखल झाल्याचे चित्र होते.

सूचना फलकांकडे दुर्लक्ष करणे, भौगोलिक परिस्थिती, परिसराची जाणीव नसणे, पाण्याच्या प्रवाहात उतरणे, तसेच अतिउत्साह, स्टंटबाजी, सेल्फीचा नाद, मद्यप्राशन करून पाण्याच्या प्रवाहात देहभान विसरून सैर करणे या लहानसहान गोष्टी धबधबाप्रेमी पर्यटकांच्या जीवावर बेतत असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनाला कलम 144/1 लागू करावा लागला आहे.  7 मे  2017 रोजी खालापूर शिरवली गावात वेदनादायी व काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. बाळगंगा नदीच्या पात्रात शुभम मिलिंद वाकनीस, तुषार गणेश आरते, तेजेस्विनी गणेश आरते, मीनाक्षी वाकनीस, गौरी गणेश आरते या एकाच कुटुंबातील पाच जणांचा कपडे धुवायला गेले असता बुडून मृत्यू झाला होता. 26 जून 2017 रोजी गाढेश्वर धरण पनवेल येथे दीपक मोहन खडू 12 व किशोर मोतीराम चामुर 50 यांचा बुडून मृत्यू झाला.

सोलनपाडा धरण कर्जत 7 जुलैला धरण क्षेत्रात अचानक पाणी वाढल्याने सचिन कानडे, दिलीप खंडागळे, प्रवीण राणे असे तीन तरुण बुडाले होते, तर एकाला वाचविण्यात स्थानिकांना यश आले होते. 2015 मध्ये राजू तिरुपती, 2016 मध्ये विनोद शेट्टी (20, जोगेश्वरी मुंबई), अमित नाझरे (24, गोरेगाव) या युवकांचा बुडून मृत्यू झाला होता. पेब किल्ला कर्जत  पाय घसरून तरुणी व तरुण टेकर्स खोल दरीत कोसळले होते. 16 जुलै 2017 बेडीस नेरळ येथे राकेश वळूज (26, घाटकोपर मुंबई) हा युवक बुडाला होता. 20 जुलैला माहुली धबधब्यात राजेश दिलीप गोकर्ण, (18, कल्याण) हा तरुण बुडाला. आनंदवाडी नेरळ  धबधबा व  पेब किल्ला दरीत कोसळून दोघांचा  मृत्यू झाला होता. भिरा देवकुंड येथे सागर दुधे (32) व राहुल उमाटे (33) यांच्यासह 4 जणांचा  मृत्यू झाला. कुंडमाळा मावळ येथे अतुल पाटील या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. अशोका धबधबा शहापूर कसारा येथे बाळासाहेब गोडसे यांचा मृत्यू झाला.

21 जुलैला बालकलाकार तेजस बोराडे वडिलांसह  किरण बोराडे आषाणे कर्जत धबधब्याजवळ ओहळात पाय घसरल्याने वाहून गेले. नागपूरच्या वेणा तलावात बोट उलटून रोषण खंदारे, अक्षय खंदारे, अंकित बोरकर, राहुल परेश अशा 11 पैकी आठ जणांचा बुडून मृत्यू झाला होता. खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावर 26 जून 2005 साली पाण्याचा प्रवाह वाढल्याने ओहळामध्ये सारिका भनगडे, रंजना भनगडे, मनीषा घोसाळकर, नागेश यादव, विजय अलीवकर असे पाच जण वाहून गेले होते, तर त्या अगोदर अभियंता यादव बुडून मरण पावला होता. 1992 मध्ये झेनिथ कारखान्यातील अधिकारी कॅप्टन जामदार यांची 18 वर्षाची मुलगी व तिची मैत्रीण वाहून गेली होती. सुभाष विठलाणी या तरुणाच्या डोक्यावर धबधब्याच्या प्रवाहात वाहून आलेला दगड कोसळल्याने मृत्यू झाला होता, तर नावे लिहिण्याच्या मोहात उंचावरून पडून तीन तरुण ठार झाले होते. 1982 साली बिहार येथून नोकरीसाठी आलेल्या तरुणाचा बळी हा या धबधब्याचा पहिला बळी ठरला होता. सन 1993 मध्ये एक जण, 95 मध्ये एक जण, 96 मध्ये एक, 1998 मध्ये दोन जण, 2001 मध्ये दोघांचा मृत्यू, तर दोन बेपत्ता असे किमान 25 ते 30 जण या धबधब्यावर प्राणास मुकले आहेत. यामध्ये खोपोलीतील आठ तरुणांचा सामावेश आहे. अश्या घटना घडल्याने झेनिथ धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. काही वर्ष यामध्ये शिथिलता आली, मात्र पुन्हा अशाच घटना घडू लागल्याने निसर्गरम्य हा धबधबा बंदीच्या आदेशाच्या चौकटीत आहे. पांडवकडा खारघर व कोंडेश्वर बदलापूर येथे ही बंदी घालण्यात आली आहे, खालापुरातील आडोशी, कर्जतमधील सोलनपाडा, पळसदरी, पाली भूतवली धरण, आषाणे धबधबा परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. सध्या अधिक चर्चेत असणारा पेण-खोपोली मार्गावरील सातेरीचा काथोड धबधबा. पेणपासून 13 किमी अंतरावर असणार्‍या या धबधब्यावर जाण्यास वर्षा सहलप्रेमी पसंती देत आहेत, मात्र या ठिकाणी कोणतीच सोयसुविधा नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत असले, तरी पेण परिसरातील तरुणाई या धरणाकडे आकर्षित होत आहे, मात्र याही धबधब्याने बळी घेतल्याची नोंद आहे. 2002 मध्ये पेणमधील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता, तर प्रतिभुशी धरण म्हनून नावारूपास येत असलेल्या पेण नगरपालिकेच्या  मोतीराम तलावाकडे पाहिले जात असून ब्रिटिशांच्या बांधणीतील मोतीराम तलावाच्या पायर्‍यांवर वर्षासहलीचा आनंद घेण्यासाठी तरुण-तरुणींसह मोठ्या संख्येने पर्यटक जात असतात. कुटुंबासह हक्काने जाण्याच्या  ठिकाणाला पसंती दिली जात आहे.

नगरपालिकेने सुरक्षेची काळजी घेतल्याची जाणीव होते. खालापुरातील भिलवले धरण परिसर वर्षासहलीसाठी मोठे आकर्षण ठरत होते, मात्र मागील काही दिवसांत मगरींचा वावर असल्याचे समोर आल्याने पर्यटकांसह गावकर्‍यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभाग व स्थानिक पोलिसांनी या ठिकाणी जाण्यास मनाई आदेश पारित केला आहे. हौस, मौजमजा जीवावर बेतत असल्याने पावसाळ्याची आनंद देणारी ठिकाणेच काळ ठरत आहेत. निसर्ग भरभरून देतो, पण त्याचा मानवाने चाकोरीत राहून आनंद लुटावयास हवा. कोकणाचे आकर्षण राज्यभरातील पर्यटकांना असते. त्यामध्ये वर्षा ऋतूत निसर्गाची सढळ हस्ते बरसात असल्याने धबधबे नदी-नाले खुलून दिसत असतात. निसर्गाच्या उधळणीने नटलेला कोकण विशेषतः रायगडातील धबधबे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. पाण्यामध्ये डुंबून आनंद लुटण्याची हौस सर्वांनाच असते, मात्र मागील काही वर्षात घडलेल्या अप्रिय घटनांनी ही पावसाळी पर्यटनस्थळे बंदीच्या कारावासात बंद आहेत.

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply