Breaking News

देवेंद्र फडणवीस : आधुनिक बाणेदार ‘चाणक्य’

‘माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली होती. त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात बाणेदारपणे परखड शब्दांत वयाच्या सहाव्या वर्षी एका मुलाने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले. संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आता राज्याचा मुख्यमंत्री म्हणून चौफेर राजकीय फलंदाजी करीत आहे. त्यांचे नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. सोशल मीडियामध्ये गेले काही महिने ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा गेल्या पाच वर्षापासून प्रत्यक्षात अवतरली असल्याचे आपण याचि देहि याची डोळा अनुभवत आहोत.

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील एक ताकदीचे नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले आहे. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून डी. एस. ई. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे. राजकारण हे सामाजिक, आर्थिक बदल घडवून आणण्याचे एक साधन आहे, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृढ विश्वास असून, आजपर्यंतची त्यांची 30 वर्षांची राजकीय कारकीर्द पाहता त्यात त्यांची हीच विचारधारा ठळकपणे दिसून येते.

देवेंद्र फडणवीसांच्या मागे त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस आणि काकू शोभाताई फडणवीस यांची पुण्याई आहेच, पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वतःचे कष्टही महत्त्वाचे आहेत. ते 17 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पदार्पण केले. पाच वर्षांत आपल्या कामाची चुणूक दाखवित आणि संघाचा पाठिंबा मिळवित वयाच्या 27 व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर होण्याचा मान त्यांनी पटकवला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मागे वळून न पाहता आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केले. त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळविला. नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोन वेळा निवडून येण्याचा करिष्मा त्यांनी दाखविला. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2009 साली तिसर्‍यांदा विजय संपादन केला. 2004 सालच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन मजबूत केले.

व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी, डीएसई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अ‍ॅन्ड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.

एलएलबी (ङङइ) (नागपूर विद्यापीठ) या ज्ञानाबरोबरच ते 1989 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष झाले.

1999 ते आजतागायत विधानसभा सदस्य म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द आपण पाहतोच आहोत.

1992 ते 2001 सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर

1992 नागपूर शहर

1994 भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष

2001 भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

2010 भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस

2013 भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष त्याचबरोबर विधिमंडळातील कार्यही मोठे आहे.

1999 पासून ते 2014 सालापर्यंत विधानसभेत आमदार, अंदाज समितीचे सदस्य, नगरविकास व गृहनिर्माणाविषयीच्या स्थायी समितीचे सदस्य, नियम समितीचे सदस्य, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समितीचे सदस्य, सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलच्या संयुक्त निवड समितीचे सदस्य, आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असून विश्लेषण करण्याची पात्रता, ‘इंधन/ऊर्जा सुरक्षितता व वातावरणातील बदल’ विषयांवरील आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये निमंत्रण, सामाजिक योगदान, ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटट फॉर एशिया रीजचे सचिव, नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबतचे रिसोर्स पर्सन, नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य, नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोसला मिलिटरी स्कूल)चे उपाध्यक्ष, संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळालेल्या मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य या अशा असंख्य बाबी आहेत की त्यावर एक भला मोठा प्रबंध होऊ शकेल. यासंदर्भात अनेकांनी लिहिलेही आहे. काहींनी त्यांचे चरित्रही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात आपल्याला त्यांची राजकीय कारकीर्द आणि विशेष म्हणजे त्यातील बाणेदार चाणक्य ही भूमिका पाहणे महत्त्वाचे आहे. अनुभवसंपन्न, अनुभवसमृद्ध, अष्टपैलू अशा देवेंद्रांच्या राजकीय कारकिर्दीला कलाटणी दिली ती भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांनी. 2009 पर्यंत पक्षातर्फे निवडून येणारा एक हुशार आणि अभ्यासू आमदार एवढीच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्राला ओळख होती, परंतु 2013 साली भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या घटनादुरुस्तीचे अधिवेशन मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होते आणि या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना अध्यक्षपदाचा कार्यकाल आणखी तीन वर्षासाठी वाढवून देणारी घटनादुरुस्ती करण्यात यायची होती. तशी ती करण्यातही आली. दुर्दैवाने गडकरी यांना त्यांनी न केलेल्या घोटाळ्यामुळे, निव्वळ आरोपावरून राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रीय पातळीवरील घटनादुरुस्ती राज्य पातळीवर सुद्धा लागू करण्यात आली. तेव्हा सुधीरभाऊ मुनगंटीवार हे प्रदेशाध्यक्ष होते. गोपीनाथरावांनी मुनगंटीवार यांना आणखी तीन वर्षे कार्यकाल वाढवून देण्यास विरोध केला. मुनगंटीवार यांनी पक्षश्रेष्ठींना मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मला जी जबाबदारी द्याल ती मी पार पाडेन, असे स्पष्ट सांगितले. मुंडे यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांचे नाव महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुचविले. अचानक नवीनच नाव पुढे येताच सारे सुरुवातीला बुचकळ्यात पडले. कोण म्हणे हा मुंडेंचा, तर कोण म्हणे हा गडकरींचा कार्यकर्ता, पण देवेंद्र फडणवीस हे ना तर मुंडेंचे ना गडकरींचे, ते होते (अजूनही आहेत) संघाचे कट्टर स्वयंसेवक. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ते कामाला लागले. 2014च्या लोकसभा निवडणुका लागल्या. देशातील काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेवरून पायउतार झाली आणि नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर आली. नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे हे भरघोस मतांनी निवडून आले होते आणि ते दोघेही केंद्रात मंत्री होणार ही खूणगाठ प्रत्येकाने आपल्या मनाशी बांधून ठेवली होती, पण घडले वेगळेच. गडकरींचा समावेश मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात केला होता आणि मुंडे यांचे नाव या यादीत नव्हते. मुंडे यांनी नवी दिल्लीत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना पाचारण केले. खडसे आणि फडणवीस हे दोघे दिल्लीत पोहोचले. मुंडे यांनी सारा प्रकार दोघांच्या कानावर घातला, पण मोदींच्या दरबारात जाणार कोण? खडसेंचं तसे काही मोदींच्या दरबारात फारसे वजन नव्हते, पण प्रदेशाध्यक्ष या नात्याने देवेंद्र फडणवीस हे मोदींच्या दरबारात जाऊ शकत होते. त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले. मोदी-फडणवीस या दोघांमध्ये व्यवस्थित चर्चा झाली. गोपीनाथ मुंडे यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत घोषणा करण्यात येणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगून आता केंद्रात मंत्री म्हणून घेतले, तर त्यांचे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होईल, म्हणून त्यांचे नाव वगळण्यात आले आहे, असे स्पष्ट केले, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर वकिली बाणा दाखवून देत नरेंद्र मोदी यांच्या दरबारात मुंडे यांची भक्कमपणे बाजू मांडली. आता जर केंद्रात मंत्री केले, तर गोपीनाथराव हे त्यांना विधानसभा निवडणुकीपर्यंतच्या सहा महिन्यात त्यांना मिळालेल्या खात्यामार्फत महाराष्ट्राकडे निधी वळवू शकतील आणि त्याचा भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होईल, असा देवेंद्रांचा बिनतोड युक्तिवाद नरेंद्रांना पुरेपूर पटला. तिथेच देवेंद्र हे नरेंद्राच्या मनात आपली भक्कम जागा निर्माण करू शकले. पुढे राजकीय घडामोडी पण अशा घडत गेल्या की तिथे देवेंद्ररूपी सोन्याचे खणखणीत नाणे राजकीय क्षितिजावर चमकू लागले. मुंडे केंद्रीय मंत्री झाले, पण दुर्दैवाने त्यांचे 3 जून 2014 रोजी अपघाती निधन झाले. त्यामुळे महाराष्ट्र भारतीय जनता पक्षात पोकळी निर्माण झाली. सगळी समीकरणे बदलली. महाराष्ट्र भाजपमध्ये कोअर कमिटी निवडण्यात आली. अर्थात देवेंद्र फडणवीस यांचाच त्यावर वरचष्मा होता. एकनाथराव खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता हे कमिटीत होते. 25 सप्टेंबर 2014 रोजी एकनाथ खडसे यांनी शिवसेना-भाजप युती तोडण्याची घोषणा केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनीही त्याच दिवशी अर्ध्या तासात आघाडी तोडली आणि 15 ऑक्टोबर 2014 रोजीच्या मतदानाला भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे चारही पक्ष स्वतंत्र लढत सामोरे गेले. लोकसभेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती झाली आणि 288 च्या सभागृहात भारतीय जनता पक्षाने 122 जागा जिंकून तो सर्वात मोठा पक्ष बनला. शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे 42 आणि 41 जागांवरच समाधान मानावे लागले आणि 15 वर्षांची राजवट गमवावी लागली. देवेंद्र फडणवीस यांचा जबरदस्त करिष्मा आणि मजबूत वजन दिल्ली दरबारी प्रस्थापित झाले असल्याने एकनाथराव खडसे यांच्या नाराजीची तेवढ्यापुरती दखल राजनाथ सिंह यांनी घेत समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण मुख्यमंत्रीपदाचा मानाचा मुकुट/तुरा देवेंद्रांच्या शिरी नरेंद्रांनी बसविला. 31 ऑक्टोबर 2014 रोजी मुंबईतील शेषराव वानखेडे क्रीडाप्रेक्षागृहात ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशा वातावरणात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित व्यक्ती या ऐतिहासिक शपथविधी समारंभात साक्षीदार म्हणून उपस्थित होत्या. विधानसभा निवडणुकीच्या निकालांची घोषणा जसजशी होत होती तसतसे अंदाज आडाखे मांडले जात होते. एकेकाळी राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी इथेही ‘गुगली’ टाकली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाहेरून भारतीय जनता पक्षाच्या सरकारला समर्थन देण्याची घोषणा केली. ज्या नरेंद्र मोदी यांनी बारामती येथे जाऊन नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे नॅशनलिस्ट करप्ट पार्टी अशी संभावना केली होती त्याच मोदींच्या पक्षाला शरद पवार हे पाठिंबा देतात? यावरून तर्ककुतर्कांना उधाण आले. देवेंद्रांच्या राजकीय कौशल्याचा कस इथेच लागला. हरिभाऊ बागडे हे विधानसभा अध्यक्षपदी निवडून आले. राजकीय हलकल्लोळ माजला होता. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे विधानसभा विरोधी पक्षनेते झाले होते, पण देवेंद्रांना आपल्या अल्पमतातल्या सरकारला स्पष्ट बहुमतात आणायचे होते. यासाठी नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची जागा दाखविणे क्रमप्राप्तच होते. डिसेंबर 2014च्या पहिल्या चारच दिवसात धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांतदादा पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांनी आपले दूत म्हणून ‘मातोश्री’वर धाडले. उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, अनिल देसाई यांच्याबरोबर चंद्रकांतदादा आणि धर्मेंद्र प्रधानांनी चर्चा केली. 5 डिसेंबर 2014 रोजी सकाळी विरोधी पक्ष असलेली शिवसेना संध्याकाळी फडणवीस यांच्या सत्तेत सहभागी झाली. 122+63=185 अशी मजबूत संख्या भाजप-शिवसेना युतीची 288च्या सभागृहात झाली आणि रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत हेही सोबत आले असल्याने (लोकसभेपासूनच सोबत होते) खर्‍या अर्थाने महायुतीचे सरकार अधिकारारूढ झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या साडेबारा एकर जमिनीवर भव्य स्मारक, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, मराठा समाजाला आरक्षण असे अनेक प्रश्न मार्गी लावतानाच पायाभूत सुविधा, आर्थिक, राजकीय आघाडीवर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बाणेदार चाणक्य नीतीचे पुरेपूर दर्शन महाराष्ट्राबरोबर देशालाही घडविले. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी घडविलेल्या राजकीय घडामोडींमुळे तर सर्वच पक्षाच्या नेत्यांना डोके खाजवायला लागले. नरेंद्र मोदी हे 2024 साली पुन्हा तिसर्‍यांदा पंतप्रधान होतील आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून पुढे येतील अशी चर्चा आताच सुरू झाली आहे. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, डॉ. मनोहर जोशी, शरद पवार हे चार चाणक्य मानले जात होते. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आज आपल्यात नाहीत. डॉ. मनोहर जोशी हे वार्धक्याने आता मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावत आहेत, पण शरद पवार यांच्या उलटसुलट भूमिकांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनाच कळेनासे झाले आहे. या सर्व परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षात काम केले आहे आणि कारकीर्द गाजवली आहे, त्यावरून त्यांनी शरद पवारांना कोसो मैल दूर सारून बाणेदार, स्वाभिमानी ‘चाणक्य’ अशी प्रतिमा तयार केली आहे. जिला अजिबात तोड नाही. अजून काही काळ तरी देवेंद्र फडणवीस हेच भारतीय राजकारणात ‘चाणक्य’ म्हणून कायम राहतील, असे चित्र दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांचे ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे सूत्र तंतोतंत पाळले असून उद्धव ठाकरे हे आपले मोठे बंधू आणि नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू ही नवी ओळख देवेंद्र फडणवीस यांनी देशासमोर करून दिल्यामुळे आगामी काही वर्षे तरी भारतीय जनता पक्ष-शिवसेना मित्रपक्षांच्या महायुतीला पर्याय नाही, हेच दिसून येते. देवेंद्र फडणवीस यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील जनतेला खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिन’ येवोत!

॥जय महाराष्ट्र॥ ॥जय शिवराय॥

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply