Breaking News

किल्ले रायगड परिसरात डोंगरउतारावर भूसंपादन करण्यास स्थानिकांचा आक्षेप

महाड उपविभागीय अधिकार्‍यांना ग्रामस्थांचे निवेदन

महाड : प्रतिनिधी

किल्ले रायगडावर आणि परिसरात रायगड प्राधिकरण आणि शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत, मात्र या विकासकामांसाठी डोंगर उतारावरील जमिनी संपादित करण्याचा डाव स्थानिक प्रशासन आणि जमीन विक्रेत्यांनी रचला असून त्याला रायगडवाडी, हिरकणीवाडीमधील ग्रामस्थांनी आक्षेप घेत अशा जमिनी संपादित केल्या जावू नयेत, याकरिता महाड उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

किल्ले रायगडावरील ऐतिहासिक स्थळांचे जतन करण्याबरोबरच गड आणि परिसरात शिवभक्तांसाठी विविध सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परिसरात वाहनतळ, शौचालये, वीज व्यवस्था, निवासाची सुविधा आदी सुविधा करण्यासाठी जमिनींची आवश्यकता आहे, मात्र गडाचा परिसर डोंगरउतारावरील असल्याने या ठिकाणी जागा मिळणे कठीण झाले आहे शिवाय येथील स्थानिक शेतकरी सहजासहजी जमीन देण्यास राजी नाहीत. असे असले तरी काही पडीक जमिनी धनदांडग्या लोकांनी आपल्या फायद्यासाठी घेतल्या आहेत. त्याला आक्षेप घेत स्थानिक ग्रामस्थांनी नव्या संपादनाला विरोध दर्शवला आहे. त्यांनी महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांना याबाबत निवेदन सादर करून फेरविचार करण्याची मागणी केली आहे.

पाचाड येथे शिवसृष्टीला संपादित केलेल्या जागेपैकी सुमारे 40 टक्के जागा तीव्र उतारावरील आहे. यातील बहुतांश जागा ही स्थानिक शेतकर्‍यांकडून अल्प दरात घेवून शासनाला प्रती गुंठा दराने विकली आहे. अशाच प्रकारे आता रायगडवाडीमधील सर्व्हे नंबर 158/0, 78/1अ, 78/1ब, 78/2ब, 78/2 ड, आणि इतर क्षेत्र असलेल्या जमिनी वाहनतळासाठी संपादित करण्याची हालचाली सुरु होताच स्थानिक ग्रामस्थांनी सदर जागा ही डोंगर उतारावरील असून यावर आपण वाहनतळ कसे उभे करणार असा प्रश्न केला आहे. यामुळे या भू संपादनाचा निवाडा रद्द करण्यात येवून रक्कम अदा केली जावू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी भाजपचे महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सावंत, भाजपचे चंद्रजित पालांडे, अजित औकीरकर, लहू औकीरकर, निलेश तळवटकर उपस्थित होते. याबाबत निजामपूर ग्रामपंचायतीनेदेखील हरकत घेतली आहे.

तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली रायगड परिसरातील जमिनींचा सर्व्हे करूनच या जमिनी संपादित केल्या जाव्यात, अशी मागणी सरपंच प्रेरणा प्रभाकर सावंत आणि उपसरपंच गणेश औकीरकर यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातच जर कोणी परप्रांतीय धनदांडगा स्थानिक शेतकर्‍यांची फसवणूक करुन स्वतःचे घबाड भरणार असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. डोंगरउतारावरील जागा संपादनाला आमचा विरोध राहील. याकडे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना लक्ष घालण्याची विनंती करु. -महेश शिंदे,सरचिटणीस, महाड तालुका भाजप

यापूर्वी संपादित झालेल्या जमिनींबाबत आपणास अधिक माहिती नाही, मात्र काही भाग डोंगरउतारावरील आहे. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीचा विचार करून योग्य पद्धतीच्या जमिनी संपादित केल्या जातील. -प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय अधिकारी,महाड

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply