आजकाल प्रामाणिकपणा, उपकाराची जाणीव समाजात दिसत नसल्याची ओरड केली जात आहे. एखाद्याकडून घेतलेली उधारी परत करण्याची दानत उरली नाही, दुकानांवर तर उधारी बंद, असे बोर्ड आपल्याला भारतात दिसतात. गरजेला घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, न्यायालयात केसेस चालू आहेत. पण काल परवा घडलेली आणि परदेशी खासदाराने दाखाविलेला प्रमाणिकपणा सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा आहे. अवघ्या दोनशे रुपयांची उधारी भागवायला केनियाचा खासदार औरंगाबादला येतो आणि हा बातमीचा आणि चर्चेचा विषय होतो. खरंतर उधारी ठरलेल्या मुदतीत भागवायची असते हे सहाजिकच आहे, पण आपल्याकडे प्रामाणिकपणा नजरेआड होत असताना असा प्रसंग घडतो आणि तो विषय चर्चेचा ठरतो.
34 वर्षांपूर्वी म्हणजे 1985मध्ये औरंगाबादेत केनियाचा एक तरुण शिक्षणासाठी आला होता. मौलाना आझाद महाविद्यालयासमोरील वानखेडेनगरात एका घरात त्याने भाड्याने खोली घेतली. घरमालकाचे किराणा दुकानही होते. त्यांच्याकडून तो रोजच्या गरजेच्या वस्तू खरेदी करत होता. शिक्षण संपल्यावर तो मायदेशी परतला. तेव्हा किराण्याचे 200 रुपये देणे राहिल्याचे त्याच्या लक्षात आले. रक्कम स्वत:हून नेऊन दिली पाहिजे, असे त्याला सारखे वाटत होते. पण भारतात येण्याची संंधी नव्हती. पुढे हा तरुण केनियाच्या राजकारणात उतरला. न्यारीबरी चाची मतदारसंघातून खासदार आणि पुढे केनियाच्या संरक्षण-परराष्ट्र व्यवहार मंत्रालय समितीचा उपाध्यक्ष झाला. गेल्या आठवड्यात त्याला अचानक केनियन शिष्टमंडळासोबत भारत दौर्याची संधी मिळाली. पंतप्रधान मोदींची भेट झाल्यावर हा तरुण औरंगाबादेत दाखल झाला. घरमालक-किराणा दुकानदारांचा शोध काढून त्याने त्यांना 200 रुपयांच्या मोबदल्यात 250 युरो डॉलर्स देत ऋण चुकवले. ही अनोखी कहाणी आहेे रिचर्ड न्यागका टोंगी आणि वानखेडेनगरातील काशिनाथराव मार्तंडराव गवळी यांची.
माजी नगरसेवक रविकांत गवळी यांचे वडील काशिनाथराव कुटुंबासोबत 1980च्या दशकात वानखेडेनगरात स्थिरस्थावर होत होते. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काही खोल्या बांधल्या होत्या. त्यांचे श्रीकृष्ण प्रोव्हिजन नावाचे किराणा दुकानही होते. 1985 मध्ये रिचर्ड त्यांच्याकडे भाडेकरू म्हणून आला. घरची परिस्थिती गरिबीची असल्याचे त्याने सांगितले. तेव्हा गवळी यांनी त्याला काही काळजी करू नकोस. मुलासारखा रहा, असे म्हणत आधार दिला. काही प्रसंगी त्याला घरी जेवू घातले. एमबीएचे शिक्षण घेत असताना रिचर्ड त्यांच्याकडून दररोज रवा, तूप, ब्रेड, अंडी खरेदी करत असे. पण पैशांसाठी काशिनाथरावांनी त्याच्याकडे तगादा लावला नाही.
1989मध्ये रिचर्डचे पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. सकाळी महाविद्यालयात पदवीग्रहण सोहळा झाला. सायंकाळी खोलीतील सामान घेऊन गवळी कुटुंबाचा निरोप घेत मायदेशी रवाना झाला. तेथे गेल्यावर त्याला किराण्याचे 200 रुपये देणे बाकी असल्याचे लक्षात आले. त्याची त्याला कायम बोच लागली होती. पुढे दिवस पालटले. रिचर्ड राजकारणात उतरला. खासदार, मोठ्या पदावरील व्यक्ती झाला. दरम्यानच्या काळात तो पत्नीला कायम 200 रुपये देणे बाकी आहे. ते दिले नाही तर परमेश्वराला काय म्हणून तोंड दाखवू, असे म्हणत असे. भारतात जाण्याची संधी मिळावी, अशीही प्रार्थना करत असे.
गेल्या आठवड्यात अशी संधी चालून आली. भारतात आलेल्या केनियाच्या शिष्टमंडळात रिचर्डचा समावेश होता. दिल्लीतील कामकाज आटोपताच रिचर्ड रविवारी दुपारी डॉक्टर पत्नीसोबत ताज हॉटेलमध्ये आले. काही मिनिटांनंतर त्यांनी हॉटेलसमोरील वानखेडेनगरात शोधाशोध सुरू केली. तेव्हा हा परिसर पूर्णपणे बदलल्याचे त्यांंच्या लक्षात आले. त्यांना फक्त गवळी एवढेच नाव आठवत होते. त्याचा उच्चारही ते गवया असे करत असल्याने ते नेमके कोणाला शोधत आहेत ते लोकांना कळाले. काही वेळानंतर त्यांच्या असे लक्षात आले की काशिनाथराव त्यावेळी बनियानवर बसलेले असत. मग त्यांनी या भागात बनियान घालून किराणा दुकानात बसणारे कोणी व्यक्ती माहिती आहेत का, अशी विचारणा केली. योगायोगाने काशिनाथराव यांचे चुलत बंधू तेथे होते आणि एका मिनिटात 30 वर्षांचा शोध संपला. एक परदेशी तरुण 200 रुपयांची उधारी लक्षात ठवतो आणि ती परत करतो. भारतीयांनी यातून बोध घ्यायला हवा.
-योगेश बांडागळे