Breaking News

गावागावांत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती

उरण : वार्ताहर

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एकीकडे अनेक प्रकारच्या नकारात्मक घटना व गैरसमजीतून नागरिकांमध्ये नैराश्यासह भीतीचे वातावरण तयार झाले आहे, तर दुसरीकडे वाढत्या रुग्ण संख्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनावर मोठा ताण वाढत आहे. हे लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी लोकजागृतीसाठी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले होते. या अवाहनाला प्रतिसाद देत पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथील ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मिशन कोरोना को हराना उपक्रमाअंतर्गत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत कंबर कसली आहे.

मागील दहा दिवसांपासून संस्थेचे तरुण कार्यकर्ते कोरोनाचे नियम पाळत रोज सकाळी आपल्या घरून शिदोरी घेऊन आपला जीव धोक्यात घालून दोन ऑटो रिक्षांना लाऊडस्पीकर लावून पनवेल, पेण, खालापूर आणि उरण तालुक्यातील गावागावात, आदिवासी वाड्यात जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करतात, तर काही कार्यकर्ते नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मोबाइल कॉलद्वारे औषधोपचाराच्या चौकशीसह समुपदेशन करून त्यांना मानसिक आधार देत त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढविण्याचे काम करीत आहेत.

सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम संवर्धनचे प्रकल्प समन्वयक उदय गावंड (एमएसडब्ल्यु) जयेश शिंदे (मानसशास्त्र विशारद) किशोर पाटील (एमबीए) यांच्यासह राजेश रसाळ, तेजस चव्हाण, राजेश  पाटील, स्मिता रसाळ, राजू पाटील, शिल्पा ठाकूर, सचिन गावंड, रोशन पवार, पांडूरंग गावंड, नरेंद्र पाटील यांच्यासह उरण तालुक्यातील श्रिया फाऊंडेशनचे संदीप म्हात्रे, विनोद म्हात्रे असे अनेक सुशिक्षित तरुण निव्वळ सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या परिसरातील गावांमध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनाची माहिती देत आहेत.

 कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी आणि गर्दीमुळे लसीकरण केंद्रांवरील होणारे संक्रमण रोखण्यासाठीचा पर्याय म्हणजे शासनाने तयार केलेले ’कोविन, आरोग्य सेतू आणि उमंग या एप्लिकेशनची माहिती देऊन प्रत्येक गावांतील किमान तीन चार तरुणांना मोबाइलवर लसीकरणासाठी पूर्व नोंदणीचे प्रशिक्षण हे तरुण देतात.

दरम्यान, ह्याच ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेने समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने मागील वर्षी लॉकडाऊनमुळे उपासमारी ओढावलेल्या डोंगरदर्‍यातील आदिवासी बांधवांना तब्बल 19 टन धान्य व जीवनावश्यक वस्तू पूरवुन केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply