Breaking News

कार वाहून जाताना वाचली; चार जण बचावले

पनवेल : बातमीदार  – दोन आठवड्यापूर्वी उमरोली येथील पुलावरून दोन जणांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. शनिवारी (दि. 20) रोजी याच पुलावरून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक चारचाकी कार वाहून जाता जाता वाचली. यातील चारही जण सुरक्षित असून घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

उमरोली गावात जाण्या-येण्यासाठी असलेल्या छोट्याशा पुलावरून 9 जुलै रोजी दुचाकीवरून वाहून गेलेल्या सारिका आंब्रे व आदित्य आंब्रे यांचा मृत्यू झाला होता. ग्रामस्थांचे न एकता आदित्य याने दुचाकी पाण्यात टाकल्याने ते वाहून गेले होते. यातील आदित्य याचा मृतदेह 11 जुलै रोजी जुई कामोठे येथे, तर सारिका हिचा मृतदेह 17 जुलै रोजी बेलापूर खाडीत सापडला होता. 20 जुलै रोजी पनवेल परिसरात पुन्हा एकदा पावसाने मुसळधार सुरुवात केल्याने गाढी नदीला पूर आला. या पुरामुळे उमरोलीच्या पुलावरून पाणी वाहून जात होते. पुलावरून फुटभर पाणी वाहून जायला लागले की येथील गावातील ग्रामस्थ बाहेर जाण्याचे थांबतात, मात्र या गावात सोसायटी झाल्याने येथे राहणार्‍या नागरिकांना या पाण्याचा अंदाज येत नाही व ते या पुलावरून पाणी वाहून जात असताना देखील गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, मात्र यामुळे 9 जुलै रोजी दोघांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. 20 जुलै रोजी पनवेलच्या दिशेने एमएच 02 ईपी 9401 गाडी येत होती. या वेळी गावातील काही ग्रामस्थ पुलाच्या पलीकडे उभे होते. पाणी जास्त वाहत जात असल्याने त्यांनी या कारचालकाला कार पाण्यात न टाकण्याचा सल्ला दिला, मात्र त्यांचे न एकता कारचालकाने आपली कार पाणी वाहून जाणार्‍या पुलावरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याची कार दोन वेळा पाण्याच्या प्रवाहामुळे मागून उचलत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्रसंगावधान राखून चालकाने कशीबशी कार पलीकडे नेली. या वेळी कारमध्ये तीन महिला व एक कारचालक असे चौघे जण होते. सुदैवाने ते पाण्यात वाहून जाता जाता वाचले असल्याचे येथील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दैव बलवत्तर म्हणून कार वाहून गेली नाही, अशी भावना या वेळी एका नागरिकाने व्यक्त केली. त्यानंतर घटनास्थळी तालुका पोलीस दाखल झाले. या वेळी कारचालक एवढा घाबरला होता की त्याला व्यवस्थित बोलता देखील येत नव्हते.

कारमधील सारे जण मुंबई येथील असून उमरोली गावातील निर्मिती गार्डन या सोसायतीत राहण्यासाठी दर शनिवारी व रविवारी येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांनी सांगितलेले न ऐकल्याने वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत.

उमरोली येथे जवळपास दीड कोटी रुपयांचा नवीन व उंच असणारा पूल बांधण्यात येत आहे, मात्र हा पूल अर्धवट स्थितीत आहे. मार्च महिन्यात या पुलाचे काम सुरू करण्यात आले असून, पूल तयार करण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply