Breaking News

विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा ; भाजप कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती एकत्र लढणार आहे. त्यासाठी जागावाटप लवकरच होईल. त्यामुळे निवडणुकीबद्दल कोणताही संभ्रम मनात ठेवू नका. विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 21) भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत केले.

मुंबईमधील गोरेगाव येथे झालेल्या भाजप कार्यसमितीच्या बैठकीला पक्षाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेश प्रभारी सरोज पांडे, राष्ट्रीय सचिव व्ही. सतीश, प्रदेश संघटन महासचिव विजय पुराणिक, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक खासदार, आमदार आणि पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मी फक्त भाजपचा मुख्यमंत्री नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे. कारण राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आहे. मुख्यमंत्री जनता ठरवित असते. प्रसारमाध्यमे संभ्रम निर्माण करतात. त्याकडे दुर्लक्ष करा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत जनतेने युतीला भरभरून मतदान केले. मतदारांनी दिलेला जनादेश अभिमानाची गोष्ट आहे, मात्र त्याचा कोणीही गर्व करू नये, जनतेला गृहित धरण्याची चूक करू नका, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

विरोधकांचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष पराभूत झालेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी तर निवडणूकच लढवली नाही. वंचितचे अध्यक्षही निवडणुकीत पराभूत झाले, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

– महाजनादेश यात्रा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्य पिंजून काढणार आहेत. भाजपची महाजनादेश यात्रा 1 ते 31 ऑगस्टदरम्यान निघणार आहे. या वेळी मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देऊन आपल्या सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती मतदारांना देणार आहेत. या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही सहभागी होणार आहेत.

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बळकट केलेली पक्षसंघटना, कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची यशस्वी कामगिरी हे सर्व आपल्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. विधानसभा निवडणुकीतही जनता आपल्या पाठीमागे नक्कीच ठामपणे उभी राहील. भाजपप्रणीत महायुती किमान 220 जागा जिंकणारच!

-चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply