पनवेल : रामप्रहर वृत्त – लेबर कोड 2020 मधील कामगारविरोधी तरतुदी मागे घ्याव्यात या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने पनवेल प्रांत कार्यालय येथे बुधवारी (दि. 28) निदर्शने करण्यात आली. भारतीय मजदूर संघाचे रायगड अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. या वेळी प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कारखान्यांना ले ऑफ, क्लोजर, कामगार कपात यासाठी परवानगीची मर्यादा 300 कामगार संख्येवरून 100 कामगार संख्या करा, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट रद्द करा, स्टॅण्डींग ऑर्डर लागू होण्याची मर्यादा 300 कामगार संख्येऐवजी 50 कामगार करा, संपासाठी नोटीसची मर्यादा 14 दिवस कायम ठेवा, कायम स्वरुपाचे काम करणार्या कंत्राटी कामगारांना कायम करण्याची तरतूद करा, सनदी अधिकार्यांना कायद्यातून सूट देण्याचे दिलेले अमर्याद अधिकार मागे घ्या, कामगार संघटना नोंदणी 60 दिवसांत देण्याची कालमर्यादा निश्चित करा, महिलांना रात्रपाळीत कामाला बोलवण्याचा निर्णय रद्द करणे आदी मागण्यांसाठी पनवेल प्रांत कार्यालयावर भारतीय मजदूर संघाच्या वतीने बुधवारी निदर्शने आली.
कोरोनाची दक्षता घेत मास्क लावून व सोशल डिस्टन्स ठेवून यामध्ये अनेक जण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या निदर्शनावेळी भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील, सेक्रेटरी रमेश गोविलकर, संघटक श्रीधर लहाने, कोकण विभाग संघटक अॅड. अनिल दुमणे, जेएनपीटी माजी विश्वस्त रवी पाटील, कामगार नेते सुधीर घरत, रवी नाईक, सुधीर पाटील, मोतीलाल कोळी, बापू दसर, मोहन येणुरे, अमित ठाकूर, रमाकांत पाटील आदी उपस्थित होते.
