Tuesday , February 7 2023

क्षुल्लक कारणावरून कामगाराचा खून

औरंगाबाद : प्रतिनिधी

विनापरवाना कंपनीच्या आत कशाला आला? असे विचारणार्‍या कामगार जगदीश प्रल्हाद भराड (35) यांच्या डोक्यात लोखंडी फावडे मारून त्यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाळूज एमआयडीसीतील श्री इंजिनिअरिंग कंपनीत मध्यरात्री ही घटना घडली. सोमेश सुधाकर ईधाटे (रा. शिरोडी बुद्रूक) असे मारेकर्‍याचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी पळून गेला असून सोमेश हा मृत कामगाराच्या ओळखीचाच आहे.वाळूज औद्योगिक वसाहतीमधील श्री इंजिनिअरिंग कंपनीत मयत कामगार जगदीश भराड अन्य लोकांसोबत रात्रपाळीला होते. रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास आरोपी सोमेश अचानक कंपनीत आला. त्या वेळी जगदीश यांनी त्याला तू कसा काय आत आला, असा सवाल केला. तुझे येथे काहीच काम नसताना तू विनापरवानगी कंपनीत कसा घुसला, असे म्हणून त्याला तत्काळ कंपनीबाहेर जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने सोमेशने जगदीशसोबत वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या वेळी जगदीश त्याला समजावत असतानाच सोमेशने कंपनीत पडलेल्या लोखंडी फावड्याच्या दांड्याने जगदीशवर हल्ला केला. या घटनेत जगदीश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. तेथील कामगारांनी जगदीशला उपचारासाठी घाटी शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथील डॉक्टरांनी जगदीशला तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच मध्यरात्री पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, सुरेंद्र माळाले, नाथा जाधव आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. एमआयडीसी वाळूज ठाण्यात आरोपी सोमेश विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply