पाली ः रामप्रहर वृत्त
पाली ते खोपोली या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाली गावाजवळ असलेल्या अधर्वट अवस्थेत असलेली कमानीच्या सळया उघड्या पडल्या असून ही कमान रस्त्यावर कोसळण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. पाली ग्रामपंचायतीने किंवा ज्या विभागाच्या अखत्यारित या कमानीची जबाबदारी येते त्यांनी कमानीचा अपघात होण्यापूर्वी पाडून टाकावी, अशी मागणी होत आहे. रायगड जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्षपद दादासाहेब लिमये यांनी 1962 ते 1967 या काळात भूषविले होते. पाली या अष्टविनायक क्षेत्री येणार्या भाविकांच्या स्वागतासाठी आणि पालीगावाला प्रवेशद्वार असावे म्हणून त्या काळात पालीला प्रवेशद्वार बांधले होते. नंतरच्या काळात नागोठणे येथील आयपीसील या कंपनीचे अवजड सामान असलेले मोठे ट्रक पाली मार्गे येत असताना ही कमान अडचणीची ठरत होती. त्यावेळेस ही कमान बरीचशी पाडली गेली. तेव्हापासून या कमानीचा एका बाजूचा अर्धवट राहिलेला भाग तसाच राहिला. परंतु एवढ्या वर्षांनंतर आता या कमानीच्या खांबाच्या तळाकडील भागाचे प्लास्टर निघून सळया उघड्या पडलेल्या स्थितीत आहेत. या कमानीची बांधणी दगडामध्ये झालेली असून आता सध्या या कमानीला कुठलाही आधार नाही. त्यामुळे ही कमान कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.