कर्जत ः बातमीदार
माथेरानमध्ये मुसळधार पाऊस पडतो. चार महिन्यात 200 इंचपेक्षा जास्त पाऊस पडतो. येथील भाग उताराचा असल्याने पावसामुळे रस्त्यांची धूप होते व रस्ते खराब होतात ही दरवर्षीची परिस्थिती बदलण्यासाठी माथेरान नगरपालिकेने अंतर्गत रस्त्यांसाठी 143 कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला आहे. नगरपालिकेला दरवर्षी या रस्त्यांची डागडुजी करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. यासाठी नगरपालिकेने एमएमआरडीएच्या माध्यमातून अंतर्गत रस्त्यासाठी 143 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव एमएमआरडीएचे अध्यक्ष तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे दिला आहे.
दरवर्षी जोरदार पावसामुळे माथेरानच्या रस्त्यांची वाताहत होते. जमिनीची धूपसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. ही गंभीर समस्या माथेरानसाठी घातक असून या रस्त्यांना सुस्थितीत आणण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्रस्ताव दाखल केला आहे व मुख्यमंत्र्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे 2023पर्यंत माथेरानमधील अंतर्गत रस्ते हे धूळविरहित होऊन पावसापासून जमिनीची धूप होणेही वाचून माथेरानवरील संकट दूर होईल.
-प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा