Breaking News

‘रोटरी’च्या वैद्यकीय सेवांचा पनवेलमध्ये शुभारंभ

गरजूंना वैद्यकीय उपचारासाठी मदतीच्या हातांची गरज- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांना उपचार घेणे शक्य होत नाही अशा गरजूंच्या वैद्यकीय उपचारासाठी मदतीचे हात पुढे आले पाहिजेत, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल डायग्नोपेनच्या वतीने खांदा कॉलनी येथील रोटरी मेगा मेडिकल सेंटरमध्ये आयोजित रोटरीच्या विविध आरोग्यसेवांच्या शुभारंभ समारंभात बोलत होते.
या कार्यक्रमास उद्योजक जे. एम. म्हात्रे, सुप्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे, रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन विलास कोठारी, डॉ. अनिल परमार, सतीश बनवट, प्रफुल्ल कोठारी आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते डायलेसिस सेंटर, डायग्नोस्टिक सेंटर, दातांचा दवाखाना, सोनोग्राफी, रक्त तपासणी या कमीत कमी खर्चाच्या वैद्यकीय सेवांचा प्रारंभ करण्यात आला.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे बोलताना म्हणाले की, पनवेलचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढत आहे. समाजामध्ये इतरांवर अवलंबून राहण्याची संख्या मोठी आहे. आजारपणही वाढत आहेत. यासाठी केंद्र व राज्य सरकार मदत करेल. आरोग्याविषयी सरकारी पातळीवर काही योजना आहेत. त्यांचा लाभही घेता येईल, परंतु समाजात असणार्‍या गरजू रुग्णांसाठी रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल हे सामाजिक बांधिलकी म्हणून आज वैद्यकीय सेवा जनतेला देत आहे. आयुष्य जगत असताना आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचे आहे यासाठी कृतीची जोड असली पाहिजे असे कार्य रोटरी क्लब करीत आहेे, जे कौतुकास्पद आहे. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या रोटरी सेंटरमध्ये डायलेसिस करणार्‍या एका रुग्णाचा एक वर्षाचा खर्च मी करणार असल्याची घोषणा केली.
रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन विलास कोठारी यांनी, गरजू रुग्णांना अल्प दरात वैद्यकीय सेवा देण्याचे आमचे स्वप्न होते, ती स्वप्नपूर्ती आज पूर्ण होत आहे. सामाजिक बांधिलकीतून हा प्रकल्प आम्ही राबवित असून आयजीपीएल कंपनीने आम्हाला सहकार्य केले असल्याचे सांगितले. डॉ. अनिल परमार यांनी रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेलतर्फे हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार राजीवन यांनी व्यक्त केले.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply