पनवेल : वार्ताहर
पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, तसेच ग्रामीण रुग्णालय पनवेल यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना विभागातील 15 विद्यार्थी मिळून रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली.
खेडोपाडी जाऊन एचआयव्हीबद्दल माहिती देऊन जनजागृती करणे, तसेच गरोदर महिलांची मोफत तपासणी करून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ नये म्हणून याची काळजी कशी घ्यावी, तसेच एचआयव्ही व एड्स होण्याची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय याबद्दलची सविस्तर माहिती लोकांना द्यावी या उद्देशाने या क्लबची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी ग्रामीण रुग्णालय पनवेल येथे सर्वांचे मोफत सामुपदेशन व एचआयव्ही तपासणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले. 1097 या टोलफ्री नंबरबद्दल या वेळी माहिती देण्यात आली. या क्लबला कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्हाटे यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सन्माननीय प्राचार्य प्रो. डॉ. वसंत बर्हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, समुपदेशक विकास कोपले, समुपदेशक रामेश्वर मुळे व प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रतिभा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्या वेळी प्रा. सूर्यकांत परकाळे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, डॉ. योजना मुनीव आणि प्रा. सागर खैरनार यांनी विशेष परिश्रम घेतले.