महामार्ग, सर्व्हिस रोडला जोड रस्ता करा; कळंबोली शहर भाजपचे सिडको अध्यक्षांना साकडे
पनवेल : रामप्रहर वृत्त
कामोठे, तसेच पनवेल-सायन महामार्गावरून कळंबोलीत जाण्याकरिता थेट शिवसेना शाखेजवळील मार्गाचा वापर करावा लागतो. यामुळे दीड ते दोन किमी वळसा घालावा लागत आहे. दोन्ही वसाहतीतील रहिवाशांची गैरसोय टळावी याकरिता कळंबोली भाजपकडून पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन देऊन महामार्ग व सर्व्हिस रोड जोडणारा जोड रस्ता तयार करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांशी समन्वयाने याबाबत ठोस कार्यवाही करणार असल्याची माहिती आ. ठाकूर यांनी दिली.
पनवेल-सायन महामार्गाचे रूंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहने सुसाट वेगाने जातात. महामार्गाच्या एका बाजूला कळंबोली, तर दुसरीकडे कामोठे नोड आहे. तसा विचार केला तर दोनही वसाहती जवळ आहेत, मात्र त्यांना जोडणारा रस्ता नसल्याने दीड ते दोन किमीचा वळसा घालून जावे लागत आहे. कामोठे किंवा मुंबईकडून येणार्यांना कळंबोलीत जायचे असेल, तर शिवसेना शाखेजवळील रस्त्याशिवाय पर्याय नाही, तसेच कळंबोलीकरांनाही येथून कामोठे वसाहतीत जावे लागते. हा मोठा वळसा असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. कळंबोली वाहतूक शाखा ते मार्बल मार्केट दरम्यान सर्व्हिस रोड आहे, मात्र त्याला महामार्गाला जोडण्याकरिता कळंबोली सब वे शिवाय दुसरा मार्ग नाही. कामोठे सिग्नलजवळ काही महिन्यांपूर्वी जोड रस्ता खाजगीरीत्या काढण्यात आला होता, मात्र मुंबईच्या दिशेने येणार्या भरधाव वाहनांमुळे अपघाताच्या शक्यतेचे कारण पुढे करीत सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता बंद केला आहे. वेळ, इंधन वाचवण्याकरिता, तसेच गैरसोय टळावी याकरिता महामार्ग आणि सर्व्हिस रोडला जोडण्याची तजवीज करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यानुसार कळंबोली शहर भाजपचे अध्यक्ष रविनाथ पाटील आणि उपाध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना साकडे घातले आहे. बुधवारी यासंदर्भात सिडको अध्यक्षांना निवेदन देण्यात आले आहे. लवकर या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिडको यांची बैठक बोलावून तोडगा काढण्याची येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अधिकृत जोड रस्ता होणार
दरम्यान, पनवेल-सायन महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. तर बाजूचा सर्व्हिस रोड सिडकोचा आहे. या दोन्ही शासकीय यंत्रणांकडून अधिकृतरीत्या जोड रस्ता करून घेण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचित केले आहे. तांत्रिकदृष्ट्या सर्व बाबींची तपासणी करून सुरक्षितता सुद्धा पाहून कळंबोली आणि कामोठेकरांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा सुरू आहे.
केएलई कॉलेजलगतचा प्रस्ताव
मुंबईकडून तसेच कामोठे येथून कळंबोलीत जाण्याकरिता पुलाखालून समोर काढण्यात आलेल्या जोडरस्ता अपघाताला निमंत्रण असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे, मात्र त्याऐवजी केएलई कॉलेजच्या समोर सर्व्हिस रोड व महामार्ग जोडण्याचा प्रस्ताव आहे.