पाली : प्रतिनिधी
परिवहन महामंडळाचे पाली (ता. सुधागड) येथील बसस्थानक समस्यांच्या
गर्तेत सापडले आहे. धोकादायक इमारत दुरुस्तीचा प्रश्न सतावत असतानाच पावसाळ्यात बसस्थानक आवारात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे बसस्थानकात येणार्या-जाणार्या प्रवासी-विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. संबंधित प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिक करीत आहेत. पाली बसस्थानक मोक्याचे असून ते अत्यंत धोक्याचे झाले आहे. चहूबाजूने मोडकळीस आलेली इमारत केव्हाही कोसळून जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. बसस्थानक आवारात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाणी व पावसाचे पाणी खड्ड्यात साचून स्थानक परिसराला तळ्याचे स्वरूप येत आहे. त्यामुळे प्रवासी, जनतेसह एसटीचालकही त्रस्त झाले. बसस्थानक आवारातील खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.