Breaking News

नागोठणे शिवाजी चौकातील वाहतूक कोंडीची एैसी की तैसी!

बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे संकेत

नागोठणे : प्रतिनिधी

बाजारहाटासाठी नागोठणे शहरात येणार्‍या नागरिकांकडून आपले दुचाकी, चारचाकी वाहन येथील शिवाजी चौक किंवा एसटी बसस्थानकाच्या आवारात उभे करण्याचा प्रकार सध्या वाढीस लागला आहे. बसस्थानक सध्या एसटी बसेसऐवजी खासगी वाहनांनी फुलून जात असल्याने एसटी बसेसना त्याचा प्रामुख्याने फटका बसत आहे. ही वाहतूक कोंडी होण्यामागे एसटी महामंडळ तसेच पोलीस विभाग नागोठणे ग्रामपंचायतीकडे

अंगुलीनिर्देश करीत असले तरी वाहतूक कोंडी होण्यामागे आमचा काहीही संबंध नसल्याचे सांगत ग्रामपंचायतीकडून हात झटकले जात असून, या बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी बिनदिक्कतपणे कारवाई करावी, असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.

नागोठणे परिसरातील वाढते औद्योगिकीकरण आणि नागरीकरणाच्या नादात सुबत्ता वाढून एकका घरात दोन-चार दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे ऐश्वर्य यायला लागल्याने शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहने पार्क करण्याचा प्रकार वाढीस लागला व त्याचा सर्वांत जास्त फटका येथील शिवाजी चौक तसेच एसटी बसस्थानक आणि प्रभूआळीतील गांधी चौकाला प्रामुख्याने बसत आहे. रविवारी किंवा इतर सुटीच्या दिवशी तर याचा बोजवाराच उडत असून या परिसरात बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या वाहनांनी रस्ताच फुलून गेलेला असतो. रविवारी

(दि. 8) सायंकाळी साडेसहा सातदरम्यान येथील एसटी बसस्थानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या वाहनांनी भरून गेले होते. उत्सुकतेने या वाहनांची मोजणी केली असता आवारात उभ्या असलेल्या खासगी वाहनांमध्ये 26 कार आणि जीप तसेच साधारणतः सव्वादोनशे दुचाकी वाहने अस्ताव्यस्तपणे उभी असल्याचे स्पष्ट झाले. या वाहनांमुळे स्थानकाचा 75 टक्के परिसर व्यापून गेला असल्याने आलेल्या एसटी बसेसना काही अंशी जागा उपलब्ध होती व त्यामुळे एसटी बसेसना या वाहनांमधून मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र दिसून येत होते.

नागोठणे एसटी बसस्थानकात ड्युटीवर असणार्‍या वाहतूक नियंत्रकांना याबाबत विचारले असता आवारात येणार्‍या या अनधिकृत वाहनांमुळे आम्ही हतबल झालो असून नागोठणे पोलीस ठाणे, ग्रामपंचायत तसेच आमच्या रोहे एसटी आगाराचे याकडे अनेकदा लक्ष वेधले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ड्युटी करून या वाहनचालकांना येथून पिटाळून लावण्याचे कामसुद्धा आम्हाला करावे लागत असते. ज्या दिवशी नागोठणे बसस्थानक आवारात फक्त एसटी बसेसच उभ्या राहतील, तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वांत भाग्याचा दिवस असेल, असे त्यांनी सांगितले.

 नागोठणे शहरातील शिवाजी चौकात फेरीवाले तसेच हातगाड्या कुठेही उभ्या राहत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होते. या गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायतीचे अनेकदा लक्ष वेधले आहे. शिवाजी चौकात आमचा वाहतूक पोलीस तैनात करण्यात येत असतो, मात्र त्याला या ड्युटीबरोबरच महामार्गाच्या पलीकडे असणार्‍या शाळेच्या वाहतूक नियंत्रणाची भूमिकासुद्धा बजवावी लागते, असे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी सांगितले.सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांच्या म्हणण्यानुसार वाहतूक कोंडी दूर करणे हे ग्रामपंचायतीचे काम नाही. पोलिसांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता या सर्व बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी. ग्रामपंचायतीकडून पोलिसांना 100 टक्के सहकार्य असेल, असे स्पष्ट केले. हातगाड्याही वाहतुकीस अडथळा ठरत असतील तर पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई करावी.

नागोठणे ग्रामपंचायतीकडून हॉटेल लेक व्ह्यूनजीक मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध केली असतानाही वाहने त्या ठिकाणी उभी का केली जात नाहीत? पोलिसांनी या अनधिकृतरीत्या उभ्या राहणार्‍या वाहनांना जॅमर लावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी व यात सातत्य राखावे.

-डॉ. मिलिंद धात्रक, सरपंच नागोठणे

मंगळवारपासून सेवेत असणार्‍या वाहतूक पोलिसांना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच परिसरात अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश देण्यात येणार आहे व यातून कोणाचीही सुटका होणार नाही.

-दादासाहेब घुटुकडे, पोलीस निरीक्षक, नागोठणे

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply