Breaking News

पनवेल स्टेशनजवळील इमारतीत संशयास्पद हालचाली

पनवेल : प्रतिनिधी

पुलवामातील दहशतवादी हल्ला, आपटा येथे आढळलेला बॉम्ब यांच्या पार्श्वभूमीवर पनवेल रेल्वेस्थानकाजवळील एका इमारतीत इसमाच्या संशयास्पद हालचाली शनिवारी (दि. 23) सकाळी 9.30 वाजता दिसल्या, मात्र पोलिसांनी याकडे कानाडोळा केल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. 

पनवेल रेल्वेस्थानकाजवळील पूर्व बाजूकडील (नवीन पनवेल) पदपथ नेहमीप्रमाणे गजबजलेला. प्रत्येक जण लोकल पकडण्याच्या घाईत होता. त्याचवेळी एनएमएमटीच्या बस थांब्याजवळील वाहतूक नियंत्रकाच्या केबिनपाशी उभ्या असलेल्या बसचालक खेडकर यांना बाजूच्या ओसाड इमारतीतील दुसर्‍या मजल्यावरील खिडकीत संशयास्पद हालचाल दिसली. त्यांनी वर पाहताच एक दाढीवाला इसम खालून कोणी तरी बघत आहे पाहताच लपला. थोड्या वेळाने पुन्हा त्या इसमाची हालचाल दिसली. खेडकारांनी वाहतूक नियंत्रक आणि  अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांना याची माहिती दिली. प्रकाश विचारे यांनी सकाळी 9.44 वाजता खांदेश्वर पोलिसांना फोन लावला. त्यांनी पोलीस पाठवतो म्हणून सांगितले. बसचालक खेडकर आपली फेरी मारून पुन्हा त्या ठिकाणी 11.30 वाजता आले. त्या वेळी तोच  दाढीवाला संशयास्पद इसम जीन्स पॅन्ट व निळ्या रंगाचा शर्ट घातलेला पाठीवर बॅग घेऊन त्या इमारतीतून स्टेशनच्या बाजूने बाहेर पडताना दिसला. त्यांनी त्याला आवाज दिल्यावर तो पळत सुटला. त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो स्टेशनकडे पळून गेला. प्रकाश विचारे हे आपले काम करून दुपारी पुन्हा त्या ठिकाणी आल्यावर त्यांना पोलीस आले नसल्याचे समजल्यावर त्यांनी पुन्हा 1.30 वाजता फोन केल्यावर 2 वाजल्यानंतर एक पोलीस येऊन चौकशी करून गेला, पण त्याने बिल्डिंगमध्ये जाऊन तपासणी वा चौकशी केली नाही. रेल्वे स्टेशनवर अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला असतानाही अशा प्रकरणी हालचाल न केल्याने खांदेश्वर पोलिसांचा हलगर्जीपणा यातून दिसून येतो. पनवेल रेल्वे स्टेशनजवळील पी 6मधील मयूर सोसायटीत पिल्लेज महाविद्यालयाच्या मालकीची असलेली बिल्डिंग नंबर 3 ओसाड पडली असून, त्यामध्ये कोणी राहत नाही. ही बिल्डिंग आणि रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक 7 यामधील भागात सध्या नवीन फलाटाचे काम सुरू आहे. या बिल्डिंगमध्ये एखादी संशयास्पद व्यक्तीच्या हालचाली सुरू असल्यास त्याची दखल नागरिकांनी घेऊन पोलिसांना कळवल्यावरही खांदेश्वर पोलीस त्या ठिकाणी वेळेवर पोहोचले नाहीत; अन्यथा ती व्यक्ती पोलिसांना सापडली असती. पोलिसांच्या या हलगर्जीपणाबद्दल आता नवी मुंबई पोलीस आयुक्त काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply