पेण ः प्रतिनिधी
पेण शहरात होत असलेले अवैध वाहन पार्किंग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, वाहनचालकांच्या बेशिस्तपणाला आवर घालण्यासाठी पेण नगरपरिषदेच्या वतीने गांधीगिरीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी नगराध्यक्षा प्रीतम पाटील व नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे.
शहरात बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असून यावर उपाय म्हणून शहरात वाहतुकीचे नियम न पाळणार्यांवर पेण नगरपरिषदेच्या वतीने प्रथमत: गांधीगिरीच्या माध्यमातून फूल देऊन वाहनचालकांना समज दिली गेली. पालिका प्रशासनाने नेमलेल्या ठिकाणी वाहने पार्किंग न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा व त्याबाबतची दवंडी पेण शहरात देण्यात आली आहे. अशा प्रकारे पालिकेचे पार्किंग व्यवस्थेबाबतचे प्रबोधनात्मक अभियान शहरात राबविण्यात आले. शहरात होत असलेली वाहतूक कोंडी आणि वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठा अडथळा निर्माण होऊन उद्भवणारी कोंडी नित्याचीच झाली आहे. यावर प्रभावी उपाययोजना व त्याच्या अंमलबजावणीसाठी शेवटी पालिका प्रशासनानेच निर्णय घेऊन गेले दोन ते तीन दिवस वाहने पार्किंगबाबतचे अभियान राबविण्यासाठी स्वत: नगराध्यक्षा या मोहिमेत उतरून वाहनचालकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करीत आहेत. वाहतूक कोंडीमुळे निर्माण होणारा मनस्ताप स्वत:सह पदपथावर चालणार्या नागरिकांनासुद्धा सहन करावा लागतो. या सर्वांचा अभ्यास करून नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी अर्चना दिवे व पालिका प्रशासनाचा अतिक्रमण विभागाचा कर्मचारीवर्ग या अभियानात उतरून वाहनचालकांना शिस्तीने पालिका प्रशासनाने नेमलेल्या पार्किंगच्या जागेवर वाहने पार्क करण्याचे आवाहन करताना दिसत होते.
मोटारसायकलचालकांना विक्रम स्टँडच्या मागे, अग्निशमन दल कार्यालयाच्या शेजारी, चारचाकी वाहनांना पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या शेजारील नगरपालिकेच्या मैदानावर गाड्या पार्क करण्याचे आवाहन या वेळी अभियानात नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केले. नगराध्यक्षांच्या या आवाहनामुळे सण-उत्सवाप्रसंगी वाहतूक कोंडीची वर्दळ निश्चितच दूर होणार असल्याचे पेणच्या नागरिकांचे म्हणणे आहे. या अभियानात गटनेते अनिरूद्ध पाटील, सभापती शहेनाज मुजावर, नलिनी पवार, नगरसेविका अष्विनी शहा, तेजस्विनी नेने, भाजप पेण शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, अजय क्षीरसागर, घाटे सर, मंडलिक आदी मान्यवर सहभागी झाले होते.
-पेण शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, यासाठी पालिका प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था केली आहे. वाहनचालकांनी त्याच जागी आपली वाहने पार्क करावी. याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येत असून, सर्वांनी शिस्तीचे पालन करून नगरपालिकेस सहकार्य करावे.
-अर्चना दिवे, पेण मुख्याधिकारी