अलिबाग : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी भाताबरोबरच अंतरपीक म्हणून कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत तूर लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्ह्यात 1200 किलो तूर बियाणांचे वाटप करण्यात आले आहे.
खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात कडधान्याचे पीक घेतले जात नाही. केवळ भातावरच अवलंबून राहावे लागते. शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, तसेच तुरीच्या लागवडीचे क्षेत्र वाढावे यासाठी बांधावर तूर लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी आत्मा योजनेंतर्गत अत्याधुनिक बियाणेही वाटप करण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर परिसरात यापूर्वी बांधावर तूर लागवडीचे प्रयोग घेण्यात आले होते. भात कापणीनंतर त्याचे उत्पादन मिळायचे. तूर बियाणांचे संशोधन करून इक्रीसॅट संस्थेने 137 दिवसांत उत्पादन देणार्या टीएस-3नामक तुरीचे बियाणे विकसित केले आहे. याच जातीच्या बियाणांचे जिल्ह्यात एक हजार 200 किलो वाटप करण्यात आले आहे. नॅशनल सीड
कॉर्पोरेशनने विकसित केलेल्या तारा या तूर बियाणांचेही शेतकर्यांना वाटप करण्यात आले आहे.