रोहे ः प्रतिनिधी – येथील एसटी स्थानकामधील शौचालयातील मैला स्थानकाच्या आवारात व रस्त्यावर येत होता. त्यामुळे प्रवासी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्याची रोहा एसटी आगार व नगर परिषदेने गंभीर दखल घेतल्यानंतर ठेकेदाराने ताबडतोब हा मैला हटवण्याचे काम सुरू केले आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून रोहा एसटी बस स्थानकातील शौचालयातील मैला बाहेर पडत होता. पावसाच्या पाण्याबरोबर हा मैला बसस्थानक आवारात व बाजूच्या बायपास रस्त्यावर आला होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. ही बाब निर्दशनास आणून दिल्यानंतर नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक निवास पाटील, एसटी आगाराचे अधिकारी पाटील, धोत्रे, गायकवाड यांनी संबंधित ठेकेदाराला परिसर त्वरित स्वच्छ करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठेकेदाराने दोन दिवसांत मैला काढून परिसर स्वच्छ केला आहे.