केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची संसदेत घोषणा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि. 18) संसदेत मोठी घोषणा केली आहे. सरकार पुढील वर्षभरात टोल नाके हटविण्याच्या योजनेवर काम करीत असल्याचे त्यांनी संसदेत सांगितले. येत्या काळात चालकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने जेवढे त्यांचे वाहन रस्त्यांवर चालेल तेवढाच टोल द्यावा लागेल, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
अमरोहा येथील बसपचे खासदार कुंवर दानिश अली यांनी गढ मुक्तेश्वरनजीक रस्त्यावर नगरपालिकेच्या सीमेत टोल नाके असल्याचा मुद्दा संसदेत उचलला होता. यावर उत्तर देताना गडकरी यांनी फास्टॅग लागू झाल्यानंतर एका वर्षाच्या आत टोल नाके हटविण्याच्या योजनेवर काम सुरू असल्याचे सांगितले.
यापूर्वीच्या सरकारमध्ये रस्ते योजनांच्या कंत्राटात थोडी आणखी मलई घालण्यासाठी असे काही टोल नाके उभारण्यात आले, जे नगरपालिकांच्या सीमेत आहेत, परंतु हे नक्कीच चुकीचे आणि अन्यायकारक आहे, असेही गडकरी म्हणाले.
आता हे सर्व टोल नाके काढले गेले तर नक्कीच रस्ता तयार करणारी कंपनी याची भरपाई मागेल, परंतु सरकारने येत्या एका वर्षात देशातील सर्व टोल नाके हटविण्याची योजना तयार केली आहे. टोल नाके हटविण्याचा अर्थ टोलवसुली बंद असा नाही, तर केवळ टोल नाके हटविणे असा आहे. सरकार सध्या अशा तंत्रज्ञानावर काम करीत आहे ज्या माध्यमातून वाहन जेव्हा राष्ट्रीय महामार्गावर येईल तेव्हा जीपीएसच्या मदतीने कॅमेरा तुमच्या वाहनाचा फोटो घेईल. तसेच जेव्हा तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून बाहेर पडाल, तेव्हा तुमच्या वाहनाचा फोटो घेतला जाईल. यानुसार वाहनचालकांना तेवढ्याच अंतराचा टोल द्यावा लागणार असल्याचे गडकरींनी सांगितले.
टोल नाक्यांवर टोलवसुलीदरम्यान वाहनांच्या लागत असलेल्या रांगांमुळे होत असलेल्या त्रासाबद्दल अनेकदा आवाज उठविण्यात आला आहे. सध्या केंद्र सरकारने सर्व राष्ट्रीय
महामार्गांवर फास्टॅगची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे लाइनमध्ये न लागताच ऑटोमॅटिक पद्धतीने टोल नाक्यांवर टोल भरता येऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.