Breaking News

नेरळचा अवसरे लघुपाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो

समाधानकारक पाऊस झाल्याने धरण भरले

कर्जत : बातमीदार – तालुक्यातील अवसरे येथील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेला लघुपाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. धरणाच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरण भरून त्यातील अतिरिक्त पाणी सांडव्याच्या माध्यमातून बाहेर पडू लागले आहे.

पाटबंधारे विभागाने कर्जत तालुक्यातील अवसरे, बिरडोळे आणि वरई गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करून अवसरे हे धरण उभारले आहे. त्या भागातील सात गावांतील 300 हेक्टर जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेल्या या धरणाची अनेक वर्षे दुरुस्ती केली नसल्याने अवसरे लघुपाटबंधारे प्रकल्पाचे पाणी शेतीला कमी पडते. त्यामुळे अवसरे भागातील शेतकरी वगळता कोदीवले, बिरडोळे, वरई, मानवली, निकोप आणि मोहाली भागातील शेतकरी उन्हाळ्यात भातशेती करीत नाहीत. धरणाची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी दरवर्षी करीत असतात, पण पाटबंधारे विभागाला शेतकर्‍यांच्या मागणीकडे बघायला वेळ नाही.

 अवसरे धरण पाण्याने तुडूंब भरले असल्याने परिसरातील शेतकरी खूश झाले आहेत. धरणात 64 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होत असून, मृत साठा वगळता ते सर्व पाणी हे शेतीसाठी देण्याचे नियोजन असते, मात्र या भागात एका खासगी पाइपलाइनचे काम करण्याकरिता शेतीसाठी पाणी देणे बंद झाले. ते आजतागायत दिले गेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना उन्हाळ्यात शेती करता येत नाही. या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात शेती केली जायची. त्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सहज शक्य व्हायचे, परंतु धरणाचे पाणी सोडले जात नसल्याने उन्हाळी शेती करणे बंद झाले आहे.

या वेळी अवसरे धरण भरून वाहू लागल्याने डिसेंबर महिन्यात शेतीसाठी पाणी सोडावे, अशी मागणी अवसरे, वरई, बिरदोले, कोदिवले, निकोप, मोहिली परिसरातील शेतकरी करू लागले आहेत.

धरणातून आम्ही दरवर्षी कमी प्रमाणात पाणी सोडत असतोच, पण भातशेती केली जाणार असेल तर मात्र शेतीच्या आवश्यकतेनुसार पाणी सोडले जाईल.

-भरत काटले, शाखा अभियंता,पाटबंधारे विभाग, कर्जत

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply