मुंबई : प्रतिनिधी
प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात पुणेरी पलटण संघाला सलग तिसर्या पराभवाला सामोरे जावे लागले. बंगाल वॉरियर्सने पुण्यावर मात केली. पुण्याचे खेळाडू या सामन्यात बंगालच्या झंझावाताचा सामनाच करू शकले नाहीत. दुसरीकडे बंगालने अष्टपैलू खेळ करीत सामन्यात बाजी मारली.
पहिल्या सत्रापासून बंगाल वॉरियर्सने आक्रमक खेळ करीत सामन्यात आघाडी घेतली होती. चढाईपटू आणि बचावपटूंमधला उत्तम समन्वय बंगालला चांगलाच फायदेशीर ठरला. बंगालच्या मणिंदरने पुण्याच्या बचावफळीला खिंडार पाडण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याला इराणच्या मोहम्मद नबीबक्षने चांगली साथ दिली. बंगालच्या चढाईपटूंना थोपविणे पुण्याच्या खेळाडूंना जमलेच नाही. दुसरीकडे बंगालच्या बचावपटूंनीही काही सुरेख पकडी करीत आपल्या संघाची आघाडी कायम राखण्यात मोलाची भूमिका बजावली. या खेळाच्या जोरावर बंगालने मध्यांतराला 18-9 अशी मोठी आघाडी घेतली.
पुणेरी पलटणकडून गिरीश एर्नाक, शहाजी जाधव या खेळाडूंनी काही गुणांची कमाई करीत बंगालला झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर खेळाडूंकडून त्यांना योग्य साथ मिळाली नाही, ज्यामुळे पुण्याचा संघ सामन्यात पुनरागमन करूच शकला नाही. दुसर्या सत्रात पुणेरी पलटणला सर्वबाद करीत बंगालने सामन्यात 24-11 अशी मोठी आघाडी घेतली. आपला संघ पिछाडीवर पडलेला पाहून प्रशिक्षक अनुप कुमारने बदली खेळाडूंना संघात जागा दिली, मात्र तरीही पुणेरी पलटणची परिस्थिती कायम राहिली. काही क्षणांमध्येच पुण्याचा संघ दुसर्यांदा सर्वबाद झाला.
अखेरच्या सत्रात पुण्याकडून पंकज मोहिते, सुशांत साहील यांनी चढाईत काही गुणांची कमाई केली, मात्र तोपर्यंत बंगालने सामन्यात भक्कम आघाडी घेतली होती. अखेरीस 43-23च्या फरकाने पुणेरी पलटणवर मात करीत बंगालने सातव्या हंगामातल्या आपल्या दुसर्या विजयाची नोंद केली.